जे सरकार तुमच्या – माझ्या हिताची जपणूक करत नाही, त्यांच्या हातात सत्ता द्यायची नाही, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील चेंबुर येथील जाहीर सभेत केले. पाच वर्षांत भाजपाची दहशत आपण बघितली, त्यामुळे आता बदल करण्याची गरज आहे असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

तसेच, नवाब मलिक यांनी विधानसभेत चांगले काम केले आहे. मंत्री म्हणूनही उत्कृष्ट काम केले आहे. प्रत्येकाची समस्या मांडायला तयार असतात, त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असेही पवार यांनी मतदारांना आवाहन केले. या सभेला आमदार किरण पावसकर, कॉंग्रेसचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, राष्ट्रवादीचे मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले, आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाषणादरम्यान पवार म्हणाले की, समान विचारधारा आत्मसात करण्याची गरज असून राज्यात सर्वसमविचारी पक्षांनी बदल करण्याचा विचार केला आहे. देशातील पर्यावरण, गरिबी यावरुन कोणत्या संकटाचा सामना करावा लागत आहे. याचा अंदाज मला आहे. आम्ही सर्व मिळून ज्याप्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्या दुर करण्याचा प्रयत्न करु असे म्हणत राज्यात परिवर्तनाची आवश्यकता आहे असे त्यांनी सांगितले.

राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, दुसरीकडे देशातील काही धनिकांचे ८० हजार कोटींचे कर्ज सरकार भरत आहे. गरिबांच्या अब्रूचे धिंडवडे काढायचे आणि धनिकांच्या मदतीसाठी धावून जायचं, असं हे भाजप सरकार आहे, असा आरोपही त्यांनी केला. मुंबई औद्योगिक शहर आहे, परंतु आज कारखाने दिसत नाहीत. आज काय स्थिती आहे? ५० टक्क्यांपेक्षा जास्त कारखाने बंद पडले आहेत. कष्टकरी कामगारांच्या हिताच्याबाबतीत केंद्र व राज्य सरकारने पाऊल टाकले नाही. १०० पेक्षा जास्त टेक्स्टाईल मिल होत्या, त्या राहिल्या नाहीत. कष्टकऱ्यांना न्याय नाही. शेतकरी, कामगार दु:खी आहेत, असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी नवाब मलिक म्हणाले की, अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील तुमची हिम्मत वाढवण्यासाठी शरद पवार इथे आले आहेत. मागच्या निवडणुकीत अतिआत्मविश्वास आम्हाला नडला होता. परंतु यावेळी कार्यकर्ता जीवतोड मेहनत करुन निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. चार वेळा आमदार, मंत्री झालो. इथल्या लोकांच्या समस्या सोडवल्या, परंतु पराभव झाल्यानंतर इथल्या लोकांच्या समस्या वाढल्या असल्याचेही मलिक म्हणाले. तसेच पाच वर्षांत आयटीआय झाले नाही. फाईल मंत्रालयात पडून आहे. हे आयटीआय बांधून नवाब मलिक जिंकून दाखवणारच असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आम्ही महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली होती. आता सरकार देतो असं म्हणत आहे. त्यातही सावरकरांना देतो अस म्हणत आहेत. उदया स्वतःच नाव टाकून यादी जाहीर करायला देखील हे मागेपुढे पाहणार नाहीत, असा टोला देखील नवाब मलिक यांनी लगावला. यावेळी एमआयएमच्या नेत्या आयेशा कादरी ,मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक केदार सुर्यवंशी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला.