26 February 2021

News Flash

अनुभवी सरकारसाठी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा – आशिष देशमुख

राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण

महाराष्ट्राताली सत्तेचा पेच अद्यापही कायमच आहे, या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी जोरदार वेग घेतला आहे. आतापर्यंत दिल्लीत असलेले काँग्रेसचे नेते आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी आज मुंबईत दाखल होत आहेत. दोन्ही पक्षांमधील नेत्यांच्या चर्चेनंतर सरकार स्थापनेच्यादृष्टीने अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आशिष देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना ‘अनुभवी सरकारसाठी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा ‘ असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आशिष देशमुख यांनी यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नागपूर दक्षिण-पश्चिममधून मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणुक लढवली होती. ज्यात त्यांचा पराभव झाला आहे. ते कट्टर विदर्भवादी म्हणून ओळखले जातात आणि या विषयावर त्यांनी अनेकदा आंदोलनं केली आहेत. शिवाय आशिष देशमुख काँग्रेसचे तरुण नेते आहेत. त्यांचे वडील रणजीत देशमुख यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढविली होती.

राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाशी बोलताना आशिष देशमुख म्हणाले की, जो कौल महाराष्ट्राच्या जनतेने दिला आहे, तो भाजपाच्या विरोधात आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात भाजपाविरोधात एक विशिष्ट नाराजी पाहायला मिळत आहे. हे पाहता भाजपाला सोडून शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर एकत्र येत असेल, तर चांगली गोष्ट आहे. मात्र, यामध्ये जो एक अनुभवी पक्ष आहे, ज्याकडे चांगले नेते आहेत, असा काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा आणि राष्ट्रवादी व शिवसेनेने त्याला पाठिंबा द्यावा, उपमुख्यमंत्रीपद त्यांनी घ्यावं अशी एक भावना संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

याचबरोबर आता जरी राज्यापालांनी राष्ट्रवादीला बोलावले असले तरी राष्ट्रवादीनंतर संख्याबळाच्यादृष्टीने जो पक्ष आहे तो काँग्रेस आहे. असं जर होत असेल तर नक्कीच राज्यात एक चांगला अनुभवी पक्ष सत्तेत येईल. या माध्यमातून राज्यात चांगली अशी सत्ता जनहितासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात स्थापन होऊ शकते. शरद पवार यांनी स्वतः सांगितले आहे की ते राज्याच्या राजकारणात परत येण्यास इच्छुक नाहीत. हे पाहता काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा, या माध्यामातून महाराष्ट्र या देशात क्रमांक एकचं राज्य होऊ शकतं, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 1:55 pm

Web Title: for an experienced government should be congress chief minister ashish deshmukh msr 87
Next Stories
1 महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस- सूत्र
2 शिवसेना-काँग्रेस आघाडीला आमचं समर्थन नाही : ओवेसी
3 ‘ही’ सहा समीकरणं जुळली नाहीत, तर राज्यात राष्ट्रपती राजवट!
Just Now!
X