काही दिवसांपूर्वी नितीन नांदगावकर यांनी मनसेची साथ सोडत हाती शिवबंधन बांधून घेतलं होतं. त्यानंतर नांदगावकर यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. त्यांना उमेदवारी देण्यात आली नसल्यानं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर नितीन नांदगावकर यांनी त्यावर स्पष्टीकरण देत काही मनसेतील काही नेत्यांमुळे हा निर्णय घ्यावा लागला असल्याचं म्हटलं होतं. यावर आता मनसेचे ठाणे-पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि ठाण्याचे उमेदवार अविनाश जाधव यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिला आहे. नितीन नांदगावकर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेण्यात खुप घाई केल्याचे ते म्हणाले.

“नितीन नांदगावकर हे मनसेचे चांगले कार्यकर्ते होते. त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घाईत घेतला. त्यांना याची भविष्यात नक्की जाणीव होईल, असं जाधव यावेळी म्हणाले. तसंच त्यांच्या समोर काही अडचणी असतील तर त्या त्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून सोडवायला हव्या होत्या. त्यातून नक्कीच मार्ग निघाला असता,” असंही ते म्हणाले.

नुकतंच नितीन नांदगावर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर त्यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली. परंतु त्यांनी आपण पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला याचं कारणं सांगितलं होतं. “आपण सुरू केलेल्या जनता दरबारात अनेक ठिकाणाहून लोक त्यांच्या समस्या मांडण्यासाठी येत होते. त्यांचे प्रश्नही त्या माध्यमातून सोडवण्याचा मी प्रयत्न केला. या जनता दरबारामुळे मिळालेली लोकप्रियता काही मनसेच्या नेत्यांना खटकली आणि त्यांच्यामुळे जनता दरबार बंद करावा लागला. तसंच हा जनता दरबार कायमचा बंद करण्यास सांगण्यात आलं. तसंच मनसेच्या काही नेत्यांनी हे हवं असल्यास तू तुझा पक्ष काढ असंही सांगून टाकलं. दरबाराच्या माध्यमातून जनतेची सेवा करता येत नसल्यानं अखेर मला मोठा निर्णय घ्यावा लागला आणि आपण शिवसेसेनेत प्रवेश केला” असल्याचं नितीन नांदगावकर म्हणाले. त्यांनी फेसबुकवर यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला होता.