सर्वच प्रमुख पक्षांकडून महिलांना अत्यल्प उमेदवारी

संजय बापट, मुंबई

राजकीय व्यासपीठ असो वा विधिमंडळ, संसदेत महिला सक्षमीकरणाचे पोवाडे गाणाऱ्या राजकीय पक्षांना निवडणुकीच्या तिकीटवाटपात मात्र सोयीस्कपणे महिलांचा विसर पडतो.  केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेतच नव्हे तर  संसद आणि विधानसभेत महिलांच्या आरक्षणासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही देणाऱ्या प्रमुख राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वााटपात मात्र केवळ जिंकणारा हवा या निकषामुळे महिला नेत्या किंवा कार्यकर्त्यांना डावलण्यात आले असावे.  एकूण उमेदवारांच्या तुलनेत राज्यात जेमतेम १० टक्के महिला रिंगणात आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात यावेळी भाजप- शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रमुख पक्षांसह आघाडी आणि अपक्ष असे १३१ पक्षांचे ३,२३७ आपले राजकीय भाग्य आजमावत आहेत. यामध्ये एकूण २३५ महिला उमेदवारांचा समावेश आहे. चिंचवड मधून   एक तृतीयपंथी उमेदवार रिंगणात आहे.

देशात आणि राज्यातही सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि विधिमंडळ, संसदेत महिलांना आरक्षण देण्याची ग्वाही देणाऱ्या भारतीय जनता पार्टीने राज्यात १६४ उमेदवार विधानसभेच्या आखाडय़ात उतरविले असून त्यापैकी केवळ १०.३६ टक्के म्हणजेच १७ महिलांना उमेदवारी दिली  आहे. तर काँग्रेसच्या अध्यक्षा महिला असताना १४७ उमेदवारांपैकी १०.२० टक्के म्हणजेच १५ महिलांना उमेदवारी दिली आहे.

देशात सर्वप्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना राजकीय आरक्षण देणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १२१ मतदार संघातून आपले उमेदवार उभे करताना केवळ सात टक्के म्हणजेच नऊ महिलांना तिकीट दिले आहे. तर १२६ जागा लढविणाऱ्या शिवसेनेने आठ जागांवर म्हणजेच सहा टक्के  जागांवर महिलांना उमेदवारी दिली आहे.

२३५ जागा लढविणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने  चार टक्के जागांवर म्हणजेच १० महिलानां उमेदवारी दिली आहे.े राज ठाकरे यांच्या मनसेने पाच महिलांना उमेदवारी दिली आहे.  मायावती यांची बहुजन समाज पार्टी राज्यात सर्वाधिक २६२ जागा लढवत असून त्यांनीही केवळ  सहा टक्के महिलांना उमेदवारी दिली आहे.

 

भाजप – १०.३६ टक्के

काँग्रेस – १०.२० टक्के

राष्ट्रवादी – सात टक्के

शिवसेना – सहा टक्के

मनसे – पाच टक्के

वंचित आघाडी – चार टक्के

पुण्यातील पर्वती मतदारसंघात भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम या दोन प्रमुख  महिला उमेदवारांमध्ये लढत आहे.