उत्सवात भेटीगाठीच्या माध्यमातून इच्छुकांची मोर्चेबांधणी

प्रबोध देशपांडे, अकोला 

गणेशोत्सव म्हटला की उत्सवाला उधाण. त्यामुळे वर्षभरापासून गणेशोत्सवाची प्रतीक्षा केली जाते. यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गणेशोत्सव आल्याने उत्साहात अधिकच भर पडली. निवडणुकीतील इच्छुकांचे पाठबळ गणेश मंडळांना लाभत असून, कार्यकर्त्यांची चांगलीच चंगळ होत आहे. गणेशोत्सवावर विधानसभा निवडणुकीचा रंग चढल्याचे चित्र दिसून येते. समाजमाध्यमांवर त्याचे प्रतिबिंब उमटले आहे. गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जात आहे.

राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागेल आहेत. निवडणुकीची आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांत जाहीर होऊ शकते. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्याचा धडाका सुरू आहे. त्यातच सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने विद्यमान आमदार व इच्छुकांना आपल्या प्रचाराची आयती संधीच मिळाली. या पर्वणीचा योग्य वापर करून इच्छुकांकडून विविध मंडळांना भेटी देत युवक, नागरिकांशी संवाद साधण्यावर भर दिला जात आहे. गणेशोत्सवाचे विविध संदेश फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवले जात आहेत. शहरातील तालीम, मंडळांची यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकीची जोरदार तयारी केली. त्यांना विद्यमान आमदारांसह इच्छुकांकडून आर्थिक पाठबळ पुरवले जात आहे. कार्यकर्त्यांमध्येही चढाओढ लागली आहे.

यंदा लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेचा गुलाल उधळला जाणार आहे. निवडणूक म्हटले, की राजकीय नेते हात सैल करतात, हा आजवरचा अनुभव कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहेच. नेत्यांकडे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वर्गणीची मागणी करण्यात आली. काहींनी भंडारा, देखावा, सजावट, मूर्ती आदींचे खर्च उचलून मंडळांना सहकार्य केले. गणेशोत्सवातून जनमानसात आपली प्रतिमा अधिक उजळ करण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून करण्यात आला. या माध्यमातून आपल्या प्रसिद्धीवर भर दिला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गणेशोत्सवातील आर्थिक उलाढाल चांगलीच वाढली आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गणेशोत्सवाच्या उत्साहाला उधाण आले. अनेक इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू असली तरी, आता बाप्पा कुणाला पावतो, हे आगामी काळच सांगू शकेल.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला

गणेशोत्सवानिमित्त शहरातील असंख्य गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. २ सप्टेंबरला जल्लोषात गणरायाचे आगमन झाले. आता दर्शन व देखावा पाहण्यासाठी भक्तांची गर्दी वाढू लागली आहे. शहरात ठिकठिकाणी गणेश मंडळांनी मोठे मंडप उभारले असून, आकर्षक गणेश मूर्तीसह सजावट करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईची झगमगाट दिसून येते. विविध देखावे करण्यात आले आहेत. अनेक मंडळांचा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आहे. विविध उपक्रमही राबवले जात आहेत. गणेशोत्सवानिमित्त शहरातील वातावरण भक्तिमय झाले आहे.