संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली होती. आज सकाळी सात वाजल्यापासून अनेक नागरिकांनी तसेच कलाकारांनी मतदानाच हक्क बजावला आहे. महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कुटुंबाने सुद्धा लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यावेळी विलासराव देशमुख यांची सून अभिनेत्री जेनेलिया डिसूझा लातूरमध्ये पडणारा पाऊस हा सासऱ्यांचा आशिर्वाद असल्याचे म्हणाली.

अभिनेता रितेश देशमुखने पत्नी जेनेलिया आणि कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान एएनआयशी बोलताना जेनेलियाने सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले. जेनेलियाला लातूरमध्ये पडत असलेल्या पावसाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने ‘लातूरमध्ये पडणारा पाऊस हा माझ्या सासऱ्यांचा आशिर्वाद आहे असे मला वाटते. हा खरंतर खूप चांगला दिवस आहे’ असे जेनेलिया म्हणाली.

जेनेलियाचे दोन्ही दीर धीरज देशमुख आणि अमित देशमुख लातूरमधून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. धीरज देशमुख हे ग्रामीण लातूरमधून लढवत आहेत तर अमित देशमुख लातूर शहरामधून निवडणूक लढवत आहेत.

९६ हजार मतदान केंद्रे

राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ९५,४७३ मुख्य तर १,१८८ सहाय्यक अशी एकूण ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. चार कोटी ६८ लाख ७५ हजार, ७५० पुरुष तर चार कोटी २८ लाख ४३ हजार ६३५ असे एकूण आठ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी दोन हजार ६३४ तृतीयपंथी, तीन लाख ९६ हजार अपंग आणि एक लाख १७ हजार ५८१सव्‍‌र्हिस मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.