मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वास

राष्ट्रनिर्माण कार्यात युवा वर्गाचे योगदान महत्वाचे आहे. आता युवकांनी नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी भाजपाला साथ द्यावी. महायुतीच्या सरकारने गेल्या पाच वर्षात अनेक योजना राबविल्या आहेत. त्यामुळे राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना– भाजपा आणि मित्रपक्ष यांचे सरकार येईल, असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी येथे गुरुवारी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यातील अमल महाडिक व सुरेश हाळवणकर हे दोन्ही उमेदवार पुन्हा विधानसभेत पोहचतील, असेही ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले डॉ. सावंत यांनी कोल्हापुर व इचलकरंजी येथे ‘कॉफी विथ युथ’ या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणाईशी संवाद साधला. वैद्यकीय शिक्षणाच्या निमित्ताने कोल्हापूरशी असलेल्या संबंधांना त्यांनी उजाळा दिला.

डॉ. सावंत म्हणाले, देश स्वतंत्र झाल्यापासून जितका विकास त्याहून अधिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकाने गेल्या पाच वर्षात विकास करून दाखवला. जनहिताच्या अनेक योजना सुरू केल्या. त्यामुळेच केंद्रात पुन्हा युतीचे सरकार आले  आहे. नवा भारत, नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी युवकांनी महायुतीच्या हाती सत्ता सोपवावी, असे आवाहन त्यांनी केले. युवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी समर्पक उत्तरे दिली.

राफेल पूजनाचे समर्थन

पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. सावंत यांनी राफेल विमानाची लिंबू बांधून पूजा करण्यात आली त्यात काहीच गैर नसल्याचे सांगितले. सीमोल्लंघनाला संपूर्ण देशात शस्त्रांची पूजा केली जाते, त्याच पद्धतीने ही देखील पूजा केली असल्याचे सांगत त्यांनी अशाप्रकारच्या पूजेचे समर्थन करीत असल्याचे नमूद केले. ३७० कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये पूर्वीपेक्षा वातावरण सुरळीत झाले आहे. काही अयोग्य घटना झाल्या असल्या तरी सद्यपरिस्थितीत वातावरण भयमुक्त झाले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.