राज्यामधील राजकीय घडामोडींना मागील काही दिवसांपासून नाट्यमय वळण मिळाल्याचे चित्र दिसत आहे. शनिवारी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सकाळी अचानक झालेल्या या शपथविधीनंतर राज्यात मोठा राजकीय भुकंप झाला. आज सर्वोच्च न्यायालयाने २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर काही तासांमध्येच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र असं असलं तरी मागील चार दिवसांपासून देशभरामध्ये केवळ आणि केवळ अजित पवार यांची चर्चा असल्याचे गुगल ट्रेण्डवरुन दिसून येत आहे. शनिवारपासून अजित पवार यांचे नाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावांपेक्षा अधिक सर्च झाल्याचे दिसून येत आहे.

गुगल ट्रेण्डनुसार शनिवारी सकाळी साडेसातपासून अजित पवार यांच्याबद्दल सर्च होण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले. त्यानंतर पुढील चार दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत सतत अजित पवार यांचे नाव सर्च होत असल्याचे दिसत आहे. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या तुलनेत अजित पवारांचे नाव अधिक सर्च झाल्याचे दिसत आहे. मेघालय, मध्य प्रदेश, मणिपूर, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड, सिक्कीम, गोवा, केरळ, आसामसारख्या राज्यांमधूनही अजित पवार यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात सर्च झाल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांच्याबद्दल ४३ टक्के सर्च झाले. शरद पवारांबद्दल ३९ टक्के आणि फडणवीस यांच्याबद्दल १८ टक्के सर्च झालं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मिझोरमसारख्या राज्यामध्ये फक्त अजित पवारांबद्दल सर्च झाल्याचे गुगल ट्रेण्ड सांगत आहे. गुजरात, जम्मू काश्मीर, कर्नाटकमधूनही अजित पवारांबद्दल मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आल्याचे चित्र दिसत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत नसल्याचे सांगत राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केलं आहे. तसेच अजित पवार यांनी वैयक्तिक कारण देत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे अशी माहितीही फडणवीस यांनी दिली आहे.