संजय बापट

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थाने रंग भरू लागला असून मतांसाठी कोणी हिरव्या मिरच्या, कोणी फुलकोबीचे वाटप करू  लागला आहे, तर कोणी हातातील चावी, अंगठी दाखवून मतदारांना आकर्षित करू लागला आहे. मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत यावेळी सर्वाधिक भार वधारला आहे तो गॅस सिंलेंडर आणि ऑटोरिक्षाचा. प्रत्यक्षात मात्र कोणाची बॅट तळपते, कोणाची शिटी वाजते, कोणाचा धनुष्यबाण कोणाला जखमी करणार, कोणाचा हात पोळणार नि कोणाचे कमळ कोमेजणार याचा निकाल येत्या २४ ऑक्टोबर रोजी लागणार आहे.

विधानसभेच्या २८८ जागांसाठी येत्या २१ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार असून त्यासाठी विविध राजकीय पक्षाचे,अपक्ष आणि स्थानिक संस्थानिक तसेच साखर, दूध संम्राट असे तब्बल तीन हजार २३७ जण आपले राजकीय भाग्य आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये भाजप,शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे अशा प्रमुख पक्षांसह तब्बल १३१ पक्ष आणि आघाडय़ांसह १४०० अपक्षांचाही समावेश आहे.

या निवडणुकीत  उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीनेसर्वाधिक २६२ मतदार संघात उमेदवार उभे केले असून त्या खालोखाल २३५ मतदार संघात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. देश आणि राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने १६४ तर  शिवसेनेने १२६ जागावर आपले  शिलेदार उभे केले आहेत. काँग्रेस १४७, राष्ट्रवादी १२१ आणि मनसे १०१ जागा लढत असून कोणत्याही प्रमुख पक्षाला २८८ जागांवर उमेदवार मिळालेले नाहीत किंवा आघाडी, युतीमुळे उमेदवार उभे करता आले नाहीत.  प्रमुख पक्षांबरोबरच बहुजन मुक्ती पार्टीने ८१, एमआयएम ४४, संभाजी ब्रिगेड ३९,बहुजन विकास आघाडी १६ कम्युनिस्ट पार्टी १६ तर आम आदमी पार्टीने २४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

या निवडणुकीसाठी १८७ चिन्हे उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यापैकी १३९ चिन्हांना उमेदवारांनी पसंती दिली आहे. यात सर्वाधिक मागणी आहे ती गॅस सिलेंडरला. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसह काही अपक्ष अशा २५६ उमेदवारांना गॅस सिलेंडर हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. तर २०३ उमेदवारांनी आपले भाग्य आजमावण्यासाठी कपबशीची निवड केली आहे.  लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने पालघरमध्ये आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची शिटी गायब केली होती. मात्र यावेळी ठाकूर यांच्या उमेदवारांना पुन्हा एकदा शिटी वाजविण्याची संधी मिळाली आहे. काही  ११५अपक्ष उमेदवारांनी ऑटोरिक्षात बसून प्रचाराला सुरूवात केली असून ९३ अपक्षांनी विजयाचा षटकार खेचण्यासाठी हातात बॅट घेतली आहे. तर ग्रामीण भागात ९३ उमेदवार ट्रॅक्टरवर बसून प्रचार करणार आहेत. ८१ उमेदवारांनी कोट तर ६४ विरोधकाच्या विजयाला कुलूप लावण्यासाठी हातात चावी घेतली आहे. ३९ उमेदवारांनी बोटात अंगठी घातली असून १७ जणांनी करवत, ५८ जणांनी टीव्ही,७४ उमेदवारांनी शिलाई मशिन हे निवडणूक चिन्ह निवडले आहे. विशेष म्हणजे चार अपक्ष उमेदवारांनी चक्क कोल्हापूरी चपला, तर पाच जणांनी हिरव्या मिरच्या तर ९ जणांनी फूलकोबी आणि एकाने फणस हे निवडणूक चिन्ह घेतले आहे.