महाविकास आघाडीच्या सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. मात्र, यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आमदारांसह सभात्याग केला. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. फडणवीसांनी सभागृहातून जायला नको होतं. त्यांनी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करायला पाहिजे होतं, असं मत पवार यांनी सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं.

अजित पवार म्हणाले, “कधी काळी त्यांची (शिवसेना-भाजपा) २५ वर्षांची मैत्री होती. त्यामुळे विश्वासदर्शक ठराव जिंकल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सभात्याग न करता उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करायला पाहिजे होते. त्यांनी घडलेल्या गोष्टी विसरुन वास्तव स्विकारायला पाहिजे. सुसंस्कृत महाराष्ट्राला पुढे नेणारे आपले कृत्य पाहिजे. सरकारला सर्वांनी हातभार लावला तर त्यातून चांगलं निष्पण्ण होईल असं मला वाटतं.”

सीपीआयचे उमेदवार आघाडीच्यावतीने निवडून आले होते. मात्र, त्यांनी आज आघाडीच्या सरकारला समर्थन दिलं नाही, अशी खंत यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केली. तसेच विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर जनतेला आता कळलेलं आहे की, महाविकास आघाडीच्या सरकारला १६९ जणांचा पाठींबा आहे. आता दुसरी महत्वाची परीक्षा विधानसभा अध्यक्ष निवडीची आहे. ही निवडणुकही सरकार जिंकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

न्यायव्यवस्थेला आपण मानतो. त्यानुसार, आजच्या हंगामी अध्यक्षांनी कामकाज चालवाचं ठरलेलं होतं. त्यामुळे भाजपाने यात भाग घ्यायला पाहिजे होता, असे अजित पवार म्हणाले.