इंदापूरची जागा राष्ट्रवादीला सुटणार असल्याने नाराज झालेल्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला ‘हात’ दाखवला. पाटील यांनी बुधवारी (११ सप्टेंबर) भाजपात प्रवेश केला. नव्या पक्षात दाखल झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांवर टीका केली. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांविषयी बोलताना पाटील म्हणाले,”अजित पवारांचं माझ्यावर फारच प्रेम आहे”, अशी कोपरखळी त्यांनी लगावली.

हर्षवर्धन पाटील यांनी या मुलाखतीतून काँग्रेसवरला धोरवर धरले. ते म्हणाले,”गेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी मदत केली. त्यांना इंदापुरातून ७१ हजार लीड मिळाला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते माझ्या घरी येऊन गेले आणि विधानसभेत सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. काँग्रेस पक्षश्रेठींनाही याची कल्पना होती. नंतर काय झालं? मी पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेत असताना मला माझ्या तिकिटाचा पत्ता नव्हता. त्यामुळे भांबावून जायचो. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे नेतेही स्पष्ट भूमिका घेत नव्हते. सोनिया गांधीही लक्ष घालू इतकचं म्हणाल्या”, असं सांगत “सध्या महाराष्ट्रातली काँग्रेस कोण चालवतंय तेच कळत नाही”, अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली.

यावेळी पक्षनिष्ठेबद्दल बोलताना पाटील म्हणाले, “पक्षावर निष्ठा असली तरी पक्षाच्या नेत्यांनाही कार्यकर्त्यांवर निष्ठा ठेवावी लागते. कारण शेवटी जनता वाढवते. त्यामुळे खरी जनतेशीच असते. माझ्यावर होत असलेला अन्याय इंदापुरच्या जनतेला सहन झाला नाही. त्यांनी मला निर्णय घ्यायला भाग पाडलं”, असे ते म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण उशिराने निर्णय घेतात-

राज्यातील नेत्यांविषयी बोलताना पाटील म्हणाले,”अशोक चव्हाण हे बैठ्या राजकारणात तरबेज आहे. पण जनतेच्या राजकारणात कमी पडतात. तर पृथ्वीराज चव्हाण हे निर्णय घ्यायला वेळ लावतात”, असे ते म्हणाले.