20 January 2020

News Flash

राजकीय घराण्यांचे वारसदारच उमेदवार

ताईच्या कन्या श्रीमती चारुलता टोकस या लोकसभेत पराभूत झाल्यानंतर त्या येथून विधानसभेसाठी लढणार असल्याची चर्चा उसळली होती.

संग्रहित

|| प्रशांत देशमुख

वर्धा व देवळी मतदारसंघात चर्चेला जोर :- राजकीय घराण्यांचे वारसदारच उमेदवार असणाऱ्या वर्धा व देवळी मतदारसंघातील निवडणूक मतदारांमध्ये चांगलीच चर्चेत आली आहे. जिल्हय़ातील चारही मतदारसंघात पारंपरिक उमेदवारांचा वरचष्मा राहण्याचा आजवरचा इतिहास आहे. यावेळीसुद्धा राजकीय वारसदार दणक्यात उमेदवारी खेचून रिंगणात आले आहे. प्रामुख्याने देवळी मतदारसंघात काँग्रेस आघाडी व युतीत दोन वारसदार एकमेकांपुढे उभे ठाकले आहे. काँग्रेसचे रणजीत कांबळे पाचव्यांदा रिंगणात आहेत. ज्येष्ठ नेत्या प्रभाताई राव यांचा मतदारसंघ म्हणून देवळीची राज्यभरात ओळख आहे. ताईच्या पश्चात हा मतदारसंघ त्यांचे भाचे रणजीत कांबळे यांच्याकडे आला. सलग चारवेळा ते निवडून आले. मतदारसंघ हातात ठेवण्यात एका अर्थाने त्यांना ताईपेक्षाही यश मिळाले. ताईच्या कन्या श्रीमती चारुलता टोकस या लोकसभेत पराभूत झाल्यानंतर त्या येथून विधानसभेसाठी लढणार असल्याची चर्चा उसळली होती. परंतु त्यांनी भावालाच पुढे केले. त्यामुळे राव कुटुंबाचा वारसदार ठरलेल्या कांबळेंना यावेळी मोठे आव्हान असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या विरोधात प्रभाताईंचे समकालीन सहकारनेते बापूरावजी देशमुख यांचे नातू व माजी आमदार प्रा. सुरेश देशमख यांचे चिरंजीव समीर देशमुख सज्ज आहेत. पवार कुटुंबीयांचे विश्वासू असल्याचा धागा झटक्यात तोडत समीर यांनी शिवबंधन बांधले. त्यांच्यासाठी हा मतदारसंघ सेनेने भाजपकडून अक्षरश: हिसकावला. देशमुख घराण्याचे वारसदार म्हणून रिंगणात उतरलेल्या समीर यांना हे अवघड धनुष्यबाण पेलायचे आहे. भाजपकडून हा मतदारसंघ निसटल्याने नाराज जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांनी बंडखोरी केली. सेनेचे उमेदवार असले तरीही देशमुखांची दारोमदार भाजप नेत्यांवरच आहे. सेना या मतदारसंघात नाममात्र अस्तित्व राखून आहे. परिणामी, भाजपचे खासदार रामदास तडस, माजी जि.प. सभापती मिलिंद भेंडे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे हे देशमुखांची धुरा सांभाळत आहेत. या तिघात एक समान धागा म्हणजे हे सर्व भाजपनेते रणजीत कांबळे यांचे कट्टर विरोधक समजले जातात. कमकुवत सेनेमुळे भाजप नेत्यांना प्रचारधुरा सांभाळावी लागत असल्याने, मायपेक्षा मावशीच कामाची, असा अनुभव देशमुख घेत आहे. भक्कम असलेल्या ताईंच्या वारसदाराला नवखे असलेले भाऊंचे वारसदार पुरून उरणार काय, असा प्रश्न चर्चेत आहे.

वर्धा मतदारसंघात शेंडे कुटुंबाचे वारसदार शेखर शेंडे हे तिसऱ्यांदा रिंगणात आहेत. गटबाजीमुळे यावेळी तिकीट मिळण्यासाठी प्रयत्नशील नसणाऱ्या शेंडेंच्या घरपोच तिकीट आली. त्यांचे वडील प्रमोदबाबू शेंडे यांनी सहावेळा येथून निवडून येत या मतदारसंघाची मशागत केली. त्यांच्या हयातीतच लढणाऱ्या शेखर यांची प्रतिमा भक्कम वारस्यावर मात करणारी ठरली. नकारार्थी प्रतिमेने दोनवेळा घात झालेल्या शेखर शेंडेंनी गेल्या पाच वर्षांत आपली समंजस प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. चुकलो असल्यास माफ  करा, अशी साद ते मतदारांना घालत असून सहानुभूतीच्या पैलूवर त्यांनी आपला प्रचार नेला आहे. यावेळीची निवडणूक शेंडे घराण्याच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न असल्याने कुटुंबीय व काँग्रेसजन एकजुटीने कामाला लागल्याचे पाहायला मिळते. मात्र त्यांच्या विरोधात भाजपचे डॉ. पंकज भोयर यांचे आव्हान सोपे नाही. गेल्या पाच वर्षांत आमदार भोयर यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आशीर्वादात आणलेला निधी व केलेली कामे ही त्यांची जमेची बाजू आहे. कामाच्या आधारावर ते दुसऱ्यांदा संधी मागत आहेत. शेखर शेंडे व पंकज भोयर यांची तुलना करीत मतदारांमध्ये होणारी चर्चा गंमतदार ठरत आहे. सहकारनेते प्रा. सुरेश देशमुख यांनी शेखर शेंडेसाठी सभा घेत कौटुंबिक वारसदाराची बाजू उचलून धरली, तर डॉ. भोयर हे पक्ष संघटनेच्या आधारे एकहाती मोर्चा सांभाळत आहेत. राजकीय वारसा नसलेल्या भोयर यांची भक्कम वारसा लाभलेल्या शेंडेंशी होणारी लढत चुरशीची ठरत आहे.

First Published on October 19, 2019 4:03 am

Web Title: hereditary candidate of the political family akp 94
Next Stories
1 अकोल्यात जातीय समीकरण निर्णायक
2 महाराष्ट्राचा प्रथम क्रमांकाचा मतदार मूळ गुजरातचा रहिवासी!
3 ३३ मतदार केंद्रे संवेदनशील
Just Now!
X