News Flash

राज्यात पनवेलमध्ये सर्वाधिक मतदार

राज्यात ३१ऑगस्टपर्यंत एकूण ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदारांची नोंदणी झाली आहे. 

राज्यात शांततेत, पारदर्शकपणे व सुलभरीत्या निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज असून आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी शनिवारी येथे दिली.  मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर खास भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात ३१ऑगस्टपर्यंत एकूण ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदारांची नोंदणी झाली आहे.  सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी ५९ लाख १७ हजार ९०१ मतदारांची वाढ झाली आहे. तसेच सन २०११च्या जनगणनेनुसार एक हजार पुरुषांमागे ९२५ महिला असे प्रमाण आहे. त्या तुलनेत सन २०१४ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण ८८९ इतके होते. महिलांचे मतदार यादीतील प्रमाण वाढविण्यासाठी आयोगाने राबविलेल्या उपक्रमामुळे हे प्रमाण आता ९१४ असे लक्षणीय सुधारले आहे. मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. ज्या नागरिकांचे नाव मतदार यादीत नाही, त्यांना नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे ४ ऑक्टोबपर्यंत मतदार यादीत  नाव नोंद करता येईल.

मतदान केंद्रांत वाढ

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ९१ हजार ३२९ मतदान केंद्रे होती. यंदा ९६ हजार ६५४ मतदान केंद्रे असतील. दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांना सोयीचे व्हावे, यासाठी पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील ५ हजारपेक्षा जास्त मतदान केंद्रे तळ मजल्यावर आणण्यात आली आहेत. तसेच मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, दिव्यांगासाठी विशेष व्यवस्था, व्हिल चेअर आदी सर्व किमान सुविधा पुरविण्यात येतील. दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी ‘पीडब्लूडी अ‍ॅप’ची सुविधा देण्यात आली आहे.

तसेच विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत ६०.३२ टक्के मतदान झाले होते. यावेळी यापेक्षा जास्त मतदान होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. निवडणुकीसाठी ६ लाख ५० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

निवडणुकीत सी व्हिजिल, सुविधा या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. नागरिकांना आचारसंहितेचा कुठे भंग होत असल्याचे दिसून आल्यास सी व्हिजिल या मोबाइल अप्लिकेशनच्या माध्यमातून तक्रार करता येईल. राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर संपर्क केंद्र स्थापण्यात आले असून तक्रार निवारणासाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. राज्यस्तरावर २४ तास ही सेवा सुरू राहणार आहे.

विधानसभा निवडणूक दृष्टिक्षेपात

* एकूण विधानसभा मतदारसंघ- २८८

* एकूण मतदार- ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११

* सर्वात जास्त मतदार – पनवेल (५ लाख ५४ हजार ८२७ मतदार)

* सर्वात कमी मतदार – – वडाळा-मुंबई (२ लाख ३९ हजार ९३५ मतदार)

*  अपंग मतदार- ३ लाख ६० हजार ८८५

*  मतदान केंद्र- ९६ हजार ६५४

* मतदानासाठी ईव्हीएम- १.८० लाख बॅलेट युनिट, १.३० लाख कंट्रोल युनिट आणि १.३५ लाख व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर

* निवडणुकीसाठी ६ लाख ५० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती

निवडणुकीमध्ये मतदान यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात एक लाख ८० लाख बॅलेट युनिट, एक लाख ३० हजार कंट्रोल युनिट आणि एक लाख ३५ हजार व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाईल. या सर्व यंत्रणांची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली असून ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2019 1:39 am

Web Title: highest voter in panvel and less in vadala abn 97
Next Stories
1 राज्यात सरासरीपेक्षा ३२ टक्के अधिक पाऊस
2 आर्थिक व्यवहारांवर लक्ष!
3 विधानसभेबरोबरच पोटनिवडणूक उदयनराजेंच्या मनसुब्यांना धक्का!
Just Now!
X