महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी विजयासाठी स्वत:ला झोकून दिलं आहे. अशातच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रात शिवसेना- भाजपा युतील बहुमत मिळेल यात कोणतीही शंका नाही. परंतु भाजपाला स्वबळावर बहुमत मिळेल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.

यावेळी अमित शाह यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबतही आपलं मत व्यक्त केलं. राज्यात शिवसेना भाजपा युती असली तरी मुख्यमंत्री हा भाजपाचाच असेल, असं शाह यांनी स्पष्ट केलं. तसंच उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम घेईल असं म्हणत पुढचे मुख्यमंत्री कोण असतील याचेही त्यांनी संकेत दिले. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केलं.

“युतीमध्ये अनेकदा कार्यकर्त्यांचा दबाव असतो. तर अनेकदा पक्षांना आपला विस्तार करायचा असतो. या गोष्टी अजिबात चुकीच्या नाहीत. लोकसभा आणि विधानसभेत शिवसेना आणि भाजपा एकत्र लढले होते आणि विजयी झाले होते. विधानसभेतही आम्ही एकत्र लढत आहोत आणि आम्ही नक्कीच विजयी होऊ,” असं शाह यावेळी युतीबद्दल बोलताना म्हणाले. शिवसेनेनेही राज्यात मुख्यमंत्रिपदाचा दावा केला आहे. यावर बोलताना अमित शाह म्हणाले, “या वक्तव्यामुळे युतीला कोणताही धोका आहे असं मी मानत नाही. नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच भाजपाकडून मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील,” ही बाब स्पष्ट आहे, असंही त्यांनी नमूद केलं.