कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांचे पुरामुळे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. पण आम्ही सांगली, कोल्हापूरला पहिल्यापेक्षा अधिक सुंदर बनवून दाखवू. यासाठी भारत सरकार महाराष्ट्र सरकारला पूर्ण मदत करेल असे आश्वासन केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी  दिले. रविवारी त्यांची कोल्हापूरमध्ये सभा होती.

आम्ही जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवून काश्मीरला भारतासोबत जोडले. कलम ३७० हटवण्याची कोणाची हिंम्मत नव्हती. ५६ इंचाची छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० हटवून दाखवले. एका देशात दोन कायदे चालणार नाहीत असे शाह यांनी ठणकावून सांगितले. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना दहशतवादी भारतात घुसायचे. आपल्या जवानांवर हल्ला करायचे. पण मनमोहन सिंग मौनात असायचे. नरेंद्र मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक करुन जशास तसे उत्तर दिले.

काँग्रेसने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दावर काही केले नाही आणि भाजपाकडून जे निर्णय घेतले जातात. त्याचा काँग्रेसकडून विरोध केला जातो असे शाह म्हणाले. शरद पवार विचारतात कलम ३७० का हटवलं ?. काँग्रेस-राष्ट्रवादीवाले जेव्हा तुमच्याकडे प्रचाराला येतील तेव्हा त्यांना जाब विचारा असे शाह म्हणाले.