|| महेश बोकडे

खासगी कार्यक्रमांसाठी स्वयंपाकींचा तुटवडा :- शहरातील हॉटेल व्यवसाय श्रावण महिन्यात निम्म्याने कमी झाल्याने व्यावसायिकांमध्ये चिंता होती. परंतु निवडणुकांमुळे व्यवसायात तेजी आला असून तो दुप्पट-तिपटीने वाढला आहे. काही पक्षाच्या नेत्यांकडून प्रचारात थकलेल्या कार्यकर्त्यांसह मित्रमंडळींना चहा, नाश्त्यासह जेवण दिले जात आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात खासगी स्वयंपाकी व्यस्त असल्याने नागरिकांना लहान-मोठय़ा कार्यक्रमासाठी स्वयंपाकी मिळण्यात अडचणी येत आहेत.

विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी प्रचारात जोर वाढवला आहे.  या रॅलीत  कार्यकर्तेही आपलाच उमेदवार विजयी व्हावा म्हणून कष्ट घेत आहेत. त्यांच्यासाठी रात्री  विविध हॉटेल्समध्ये जेवण्याची सोय करण्यात येत आहे. पार्सललाही मागणी वाढली आहे. ही मागणी सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याचे हॉटेल व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.

मांसाहाराला सर्वाधिक पसंती

सुमारे ६५ ते ७० टक्के ग्राहक मांसाहाराला तर ३० ते ३५ टक्के ग्राहक हे शाकाहारी खाद्यपदार्थाला पसंती देत आहेत. सामान्यत: सुटय़ांच्या दिवशी शहरातील हॉटेल्समध्ये सहकुटुंब गर्दी राहत होती. परंतु आता निवडणुकीमुळे रोजच गर्दी वाढली आहे.

श्रावण महिन्यात व्यवसाय निम्म्याने कमी झाल्यावर आर्थिक अडचणींचा सामना माझ्यासह इतरही अनेक हॉटेल्स व्यावसायिकांना करावा लागला. परंतु हल्ली निवडणुकीमुळे ग्राहक वाढले असून पार्सलही जास्त मागवले जात आहे.’’ – हर्षल रामटेके, बीईंग फुडीज रेस्ट्रॉरन्ट.