मी लोकांच्या हितासाठी पक्षांतर केलं आहे माझा त्यामागे कोणताही स्वार्थ नाही अशी रोखठोक भूमिका उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात मांडली माझी भूमिका स्पष्ट असते, मी समस्यांवर आधारित राजकारण करतो कोणत्याही पदासाठी नाही. मी लोकांच्या हितासाठी आणि समस्यावर आधारित काम करण्यासाठी पक्षांतर केल्याचं स्पष्टीकरण उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात म्हटलं आहे. त्यांना यावेळी श्रीनिवास पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. श्रीनिवास पाटील हे तुमच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत, त्यावर उदयनराजे म्हणाले, ” श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवू दे तो त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे. जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे आणि जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेतला आहे” असंही उदयनराजेंनी म्हटलं. त्यावर श्रीनिवास पाटीलही हेच म्हणत आहेत असं पत्रकारांनी म्हणताच उदयनराजे म्हणाले बरोबर आहे याचाच अर्थ श्रीनिवास पाटील माझ्या मताशी सहमत आहेत हा होतो असं वक्तव्य केलं.

 

“माझी भूमिका स्पष्ट असते आत-बाहेर काही नसतं. मी समस्यांवर आधारीत राजकारण करतो पदासाठी काहीही करत नाही” असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे. काही महिन्यांपूर्वी तुम्ही नरेंद्र पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती आता तुम्ही त्यांच्यासोबत आला आहात कसं वाटतंय असं उदयनराजेंना विचारण्यात आलं. ज्यावर उदयनराजे म्हणाले की कसं वाटतंय?तुम्ही हा प्रश्न इतरांना का विचारत नाही? त्यांनी पक्षांतर का केलं? त्या लोकांनी पक्षांतर केलं कारण त्यामागे त्यांचा स्वार्थ होता. मी लोकांच्या हितासाठी पक्षांतर केलं आहे. मला इश्यू बेस्ड राजकारणात रस आहे. कोणतंही पद मिळवण्यासाठी मी राजकारण करत नाही असंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

तुम्ही श्रीनिवास पाटील यांच्या मिशांना घाबरत होतात आताही घाबरता का? असं विचारलं असता हो आताही घाबरतो त्यात काय? ते माझे जुने मित्र आहेत असं उत्तर उदयनराजेंनी दिलं.