विधानसभा निवडणुकी निकालांनतर साधारण महिनाभर चाललेल्या नाट्यमय सत्तासंघर्षानंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे. मात्र या राजकीय महानाट्याचे खरे सूत्रधार हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार असल्याची राज्यभरासह देशभर जोरदार चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी माहिती दिली आहे. निकाल लागल्यापासून जे काही घडकत होतं त्यावर माझं बारकाईने लक्ष होतं, शिवाय भाजपा व शिवसेनेतील अस्वस्थता देखील मला जाणवत होती, असं त्यांनी म्हटलं आहे.

काही गोष्टी घडत आल्या,त्यामुळे जे घडतं आहे. त्यावर लक्ष ठेवून त्यात योग्यवेळी आपण उतरणं हे मी ठरवलं होतं. निवडणुकीनंतर जनमत पाहून मी माझ्यापक्षाच्यावतीने विरोधीपक्षात बसण्याची जाहीरपणे भूमिका घेतली होती. याद्वारे आम्हाला संदेश द्यायचा होता की, आम्हाला केवळ सत्ताच हवी आहे असं काही नाही. काँग्रेस आणि आमचं संख्याबळ देखील पुरेसं नव्हतं, म्हणून आम्हाल त्या मार्गाने जायचं नव्हतं, असं पवार एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

याचबरोबर निकालानंतर कळत न कळत भाजपा आणि शिवसेनेत एकप्रकारची अस्वस्थता जाणवतं होती. एकीकडे भाजपाने उमेदवारी डावलेल्यांची अस्वस्थता माझ्या लक्षात येत होती. तसेच, भाजपा नेतृत्वाबद्दलही नाराजी असावी असं मला जाणवत होतं. दुसरीकडे सेनेत अनेकांना असं वाटत होतं की, आपण नेहमीच दुय्यम भूमिका काय घ्यायची. विशेषता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना तुम्ही महाराष्ट्रातील सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, अशाप्रकराचे मार्गदर्शन करण्यात आलेलं होतं. हे पाहता शिवसेनेतही असा मोठा वर्ग आहे की ज्याला बाळासाहेबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत होता, असे देखील त्यांनी सांगितले.

यंदा जे काही निकाल लागले यात कोणतेही दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार तयार होणार नव्हत. भाजपा-शिवसेनेने सरकार स्थापन करण्यास हरकत नव्हती. मात्र, तसे झालं नाही. मला शिवसेनेकडून खात्री हवी होती, जेव्हा मला शिवसेनेची खात्री पटली तेव्हा मी थेट सोनिया गांधी यांची भेट घेतली होती.काँग्रेसमध्ये जो नवीन आलेला वर्ग होता, याताली अनेकांशी माझे चांगले संबंध होते. या सगळ्याची माझ्याबद्दलची भूमिका आस्थेशी असल्याने ते माझ्या संपर्कात होते. तेव्हा माझ्या लक्षात आले की उद्या आपण काही निर्णय घेतला तर हे आपल्याबरोबर येतील. त्यादृष्टीने पावलं टाकण्यास सुरूवात झाली. यानंतर काँग्रेसने सर्व आमदारांना जयपुरला पाठल्याने एक त्यांच्यात आपण काहीतरी वेगळं करण्यासाठी हातभार लावला पाहिजे अशी भावना निर्माण झाली. मी देखील त्यांना तुमची तयारी असेल तर बाकीची खबरदारी मी घेतो असा विश्वास दिला. यानंतर त्यांची तयारी असल्याचे मला दिसायला लागले. यानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी मीच बोलावं असं मला काही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं. यानंतर मी थेट त्यांच्याशीच चर्चा केली. आम्ही एक ठरवलं होतं की काहीही करायचं असेल तर काँग्रेसला बरोबर घेऊनच करायचं आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.