काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नीती अजूनही उद्धव ठाकरेंना कळली नाही का? हे दोन्ही पक्ष उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला उल्लू बनवत आहेत असं वक्तव्य भाजपाचे नेते नारायण राणे यांनी केलं आहे. द रिट्रिट हॉटेलमध्ये उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. यानंतर काही वेळातच नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आघाडी म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष शिवसेनेला उल्लू बनवत आहेत असं वक्तव्य केलं.

एवढंच नाही तर आता भाजपाचं सरकार कसं आणायचं याची तयारी आम्ही सुरु केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी माझ्या खांद्यांवर टाकली आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता भाजपा सत्तास्थापनेच्या हालचाली करणार हे उघड आहे. त्यानुसारच नारायण राणे हे तयारीला लागले आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नेमकं तुम्ही काय करणार? १४५ ची मॅजिक फिगर कशी गाठणार? हे प्रश्न विचारल्यानंतर याबाबत काहीही भाष्य करणार नाही असं नारायण राणे यांनी सांगितलं इतकंच नाही तर शिवसेनेने त्यांना मूर्ख बनवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ओळखावं असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच जेव्हा भाजपा राज्यपालांकडे जाईल तेव्हा  १४५ आमदारांची यादी हातात घेऊन जाईल आणि सत्ता स्थापन करेल रिकाम्या हाती आम्ही जाणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसंच ही जबाबदारी आता माझ्या खांद्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपाला सत्तेसाठी निमंत्रण दिलं मात्र भाजपाने शिवसेना सोबत नसल्याने सत्ता स्थापन करण्यास असमर्थ आहोत असं म्हटलं. त्यानंतर शिवसेनेला बोलवण्यात आलं मात्र शिवसेनाही आमदारांची यादी देऊ शकली नाही. त्यामुळे त्यांचीही वेळ निघून गेली. आज राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिलं होतं. मात्र त्यांची २४ तासांची मुदत संपण्याआधीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आणि संध्याकाळी ५ नंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागूही झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस हा विविध घडामोडींचा होता. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही चर्चेच्याच भूमिकेत आहेत. कालपासूनच्या घडामोडी पाहिल्यावर नारायण राणे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष शिवसेनेला उल्लू बनवत आहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे.