पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ५०-५० चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेला नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर पुढच्या आठवड्यात शपथविधी अपेक्षित आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पत्रकारांना आज दिवाळी फराळानिमित्त वर्षावर बोलवण्यात आलं होतं. त्यावेळीच देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. हे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये केलं आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल २४ ऑक्टोबर रोजी लागले. या निकालांमध्ये भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? हा पेच महाराष्ट्रापुढे आहे. खरंतर निकालाच्या दिवशीच झालेल्या पत्रकार परिषदेत सगळं काही ठरल्याप्रमाणे होईल महायुतीचा विजय झाला आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. तर उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आता मी भाजपाच्या सगळ्या अडचणी समजून घेणार नाही असं स्पष्ट केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना काय भूमिका घेते याकडेही महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. दरम्यान शनिवारी मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत ५०-५० च्या फॉर्म्युल्याप्रमाणे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं आणि याबाबत लेखी घ्यायचं असा ठराव झाला.

शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी यासंदर्भात उद्धव ठाकरेंकडे मागणीही केली. एवढंच काय मातोश्रीबाहेर आणि वरळीत आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरही झळकले. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपा यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री होणार  असं म्हटलं आहे. एवढंच नाही तर ५०-५० चा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.  भाजपाच्या नेतृत्त्वातच सरकार स्थापन होईल असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अगदीच आडमुठी घेणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ही बाब विशेष नमूद करावी लागेल. कारण काही मागण्या मेरिटवर तपासून पाहू असंही त्यांनी म्हटलं आहे.  पावसात भिजावं लागतं त्यात आम्ही कमी पडलो असा टोलाही देवेंद्र फडणवीस शरद पवार यांना लगावला.