‘गेल्या ५० वर्षांपासून कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या धनाढ्य घराण्याने एकही विकास काम केलं नसल्याने अश्या धनाढ्य शक्तीला जनता कौल देणार नाही. तसेच, आगामी मंत्रिमंडळात मला निश्चित स्थान मिळणार असल्याचा विश्वास, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार व भाजपचे कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना महाआघाडीकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

राम शिंदे यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, नक्कीच एक मोठी धनाड्य शक्ती या मतदारसंघात आल्यानंतर निश्चितच हा मतदारसंघ चर्चेत येण अपेक्षित आहे. परंतु ग्रामस्तरावर जर आपण याचा विचार केला तर मला असं वाटतं की, शेवटी आपला माणुस तो आपला माणुस आहे व परका माणुस तो परका. एवढी मोठी राजकीय शक्तीचा या कुटुंबाचा ५० वर्षातील इतिहास राहिलेला आहे, परंतु कर्जत-जामखेडमध्ये त्या भावनेतुन त्यांनी बघितलं नाही. कोणतीही विकास कामं केली नाहीत. त्यामुळे येथील जनता त्यांना स्वीकरणार नाही. माझ्या पाठीशी जनतेचे मोठे समर्थन असल्याने माझा विजय निश्चित आहे.

तसेच मंत्रीपदाबाबत बोलताना ते म्हणाले की, महाजनादेश यात्रेवेळी मुख्यमंत्र्यांनी मी पुन्हा एकदा राम शिंदे यांना मंत्री करणार असल्याचे सांगितले होते. ही एकप्रकारे मी केलेल्या कामांचीच पावती आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या मंत्रिमंडळात मला निश्चित स्थान असेल. तसेच मला जे काम मिळेल त्या कामास न्याय देण्याची भूमिका मी आगामी काळात पार पडणार असल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.