मी लवकरच भाजपात प्रवेश करणार आहे शिवसेना आणि भाजपात यांच्यात काहीही ठरो असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली. या यात्रेचं स्वागत नारायण राणे यांनी केलं.

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेनंतर पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना आपण आपला पक्ष भाजपात विलीन करणार असल्याचं स्पष्ट केलं. मुंबईत कार्यक्रम घेऊन भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणाही नारायण राणे यांनी केली. इतकंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे त्यामुळे शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्न येत नाही असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

मी ज्या दिशेने जातो तिथलं पारडं जड होतं. मी भाजपात गेल्याने भाजपाचंही पारडं जड होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर मला महाजनादेश यात्रेत येण्याचं निमंत्रण दिलं असतं तर मी त्यांच्यासोबत या यात्रेत सहभागी झालो असतो मात्र निमंत्रण न दिल्याने मी व्यासपीठावर गेलो नाही असंही राणे यांनी स्पष्ट केलं. इतकंच नाही तर नितेश राणेंसह महाराष्ट्र स्वाभिमानचे सगळे कार्यकर्ते भाजपाच्या तिकिटावरच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत असंही नारायण रामे यांनी स्पष्ट केलं. तसेच मी निवडणूक लढवणार नाही असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.