ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राची जनता शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहू इच्छिते असंही त्यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटप झालं पाहिजे अशीही मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. शरद पवार यांची जी भेट घेतली त्यामागे राजकारण शोधू नका असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तर तसे घडणार असेही राऊत यांनी स्पष्ट केलं.

शरद पवार यांच्या भेटीमागे राजकारण नाही. त्यांची भेट मी अधूनमधून घेत असतो. शरद पवार हे देशाचे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा होत असतो त्याचमुळे मी त्यांची भेट घेत असतो. माझ्यावर टीका होते तरीही मी भेट घेत असतो असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. सत्तेत समसमान वाटा हवा अन्यथा शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते आणि आपला मुख्यमंत्रीही बसवू शकते असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आणखी वाचा- शिवसेनेला वाटत असेल तर त्यांचा मुख्यमंत्री होऊ शकतो : नवाब मलिक

काँग्रेस नेते सोनिया गांधींच्या भेटीला गेले आहेत. ते शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा करण्यासाठी गेले आहेत त्याबाबत काय सांगाल? असं विचारलं असता आम्ही काँग्रेससोबत जाऊ असं वाटत नाही.  काँग्रेसचे नेते दिल्लीत का गेले? हे ठाऊक नाही हे तेच नेते सांगू शकतात असंही राऊत यांनी स्पष्ट केलं उद्धव ठाकरेंनी असं काही आमदारांच्या बैठकीतही सांगितलेलं नाही. काही चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी जर तसं म्हटलं आहे तर मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल यात शंका नाही असंही राऊत म्हणाले आहेत. ज्यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही त्यांनी सत्तास्थापनेचे धाडस दाखवू नये असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.