विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून राज्यात भाजपा-शिवसेनेत सत्तास्थापेनवरून तसेच मुख्यमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अद्यापही सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर विविध मार्गांनी दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचे दिसत आहे. एकीकडे या घडामोडी घडत असताना काल रात्री शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधान आले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी शिवसेनेला वाटत असेल तर त्यांचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असे म्हटले आहे. तसेच जर भाजपा-शिवसेना सरकार स्थापन करण्यात अयशस्वी ठरत असतील, तर निश्चितपणे आम्ही सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा- मुख्यमंत्री पदाचा वाद : भाजपा-शिवसेनेला राष्ट्रवादीनं सुचवला नवा फॉर्म्युला

आमदार नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, पवार साहेब महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत, सर्व पक्षांमधील नेते त्यांना भेटत असतात. पवार साहेबांनी देखील कुणाला भेट घेण्यास नकार दिलेला नाही. संजय राऊत यांनी स्वतः त्यांच्या ट्विटरद्वारे त्यांच्या भेटीची माहिती दिलेली आहे. जर ते स्वतः हे सांगत असतील तर आम्ही देखील नाकारत नाही. भाजपा-शिवसेना महायुतीला सरकार स्थापन करण्यासाठी महाराष्ट्राने जनादेश दिला आहे. आम्हाला वाटतं की त्यांनी राज्यात सरकार बनवावं, सर्वात मोठा पक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांनी दावा करावा, सरकार स्थापन करावं व विधानसभेत बहुमत सिद्ध करावं. जर ते बहुमत सिद्ध करू शकले नाही, तर निश्चितच सरकार टिकणार नाही. तेव्हा आम्ही पर्यायी सरकार स्थापनेसाठी नक्कीच प्रयत्न करू व आम्ही हे नाकारत नाही. तसेच, जसे की शिवसेनेचे म्हणने आहे की, त्यांचा मुख्यमंत्री बनेल. जर त्यांची इच्छा असेल तर बनू देखील शकतो. यात कोणालाही शंका नसावी. मात्र, आम्हाला विरोधी पक्षाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. भाजपा-शिवसेनेने स्थिर सरकार स्थापन करावं. जर ते यात अयशस्वी ठरत असतील, तर अन्य पर्यायांबाबत विचार होऊ शकतो, असेही मलिक यांनी यावेळी सांगितले.

तसेच, महाराष्ट्राची जनता शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहू इच्छिते,  ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.  इतकंच नाही तर मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटप झालं पाहिजे अशीही मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. शरद पवार यांची जी भेट घेतली त्यामागे राजकारण शोधू नका असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तर तसे घडणार असेही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.