राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. काँग्रेस – राष्ट्रवादीच्या बैठकांचे सत्र सुरूच आहे. नवी दिल्लीत सकाळपासून काँग्रेस कार्यकारिणी  समितीची बैठक सुरु असून यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासमोर एकसुत्री कार्यक्रम मांडण्यात आला असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, के. सी वेणूगोपाल, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नसीम खान, नितीन राऊत यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक सुरु आहे. तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी, आम्हाला जर एकत्र सरकार चालवायचे असेल, तर काही मुद्दे स्पष्ट करून घेणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे.

” जर आम्हाला पाच वर्षे सोबत सरकार चालवायचे असेल, तर असे अनेक मुद्दे आहे की जे स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. चर्चा सुरू आहेत, आज आम्ही मुंबईत जाणार आहोत”. असे बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना सांगितले आहे.

काल सायंकाळी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. तर राज्याला लवकरच स्थिर सरकार मिळण्याबाबत अंतिम निर्णय होईल, असे या बैठकीतून बाहेर येऊन माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले होते. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक उपस्थित होते. यानंतर आज देखील काँग्रेसच्या बैठकांचे सत्र सुरूच आहे.

दुसरीकडे “राज्यात १ डिसेंबरपूर्वी सरकार स्थापन होईल. काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पार पडलेली बैठक ही सकारात्मक झाली. सरकार स्थापनेसंदर्भात त्यांनी काही निर्णय घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. बैठकीनंतर आघाडीच्या काही नेत्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली आहे आणि लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन होईल,” अशी माहिती शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

याचबरोबर “डिसेंबर महिना उजाडण्यापूर्वी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन होईल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची उद्या मुंबईत बैठक होईल. आम्हाला पाच वर्ष सरकार चालवायचं आहे. काँग्रेसचे नेतेही बैठकांसदर्भातील माहिती काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना देत आहे. सध्या तरी त्यांची भेट घेण्याचं कोणतही नियोजन नसल्याचंही,” राऊत यांनी स्पष्ट केलं.