News Flash

तुम्ही वाघ आहात तर फडणवीस रिंगमास्टर, व्यंगचित्रातून शिवसेनेला टोमणा

भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी एक व्यंगचित्र टि्वट करुन शिवसेनेला टोमणा मारला आहे.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरुन शिवसेना-भाजपामध्ये कुरघोडीचे राजकारण रंगलेले असताना दोन्ही पक्षाचे नेते व्यंगचित्राच्या माध्यमातून परस्परांना टोमणे मारत आहेत. शिवसेनेने आज मुख्यमंत्रिपदाच्या मागणीचा पुनरुच्चार केल्यानंतर दिल्ली भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी एक व्यंगचित्र टि्वट करुन शिवसेनेला टोमणा मारला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात आम्ही सरकार स्थापन करु असे विधान केल्यानंतर तेजिंदर बग्गा यांनी राजकीय व्यंगचित्र टि्वट केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वाघ ही शिवसेनेची ओळख आहे. बग्गा यांनी टि्वट केलेल्या व्यंगचित्रात एक वाघ असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रिंगमास्टरच्या भूमिकेत दिसत आहेत.

या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये एक रिंग असून ते आनंदी मूडमध्ये दिसत आहेत. “शेवटी तुला यायचेच आहे, फक्त थोडा वेळ लागेल” असा संदेशही या व्यंगचित्रावर आहे. यापूर्वी सुद्धा राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपाने अशा चित्रांच्या माध्यमातून परस्परांना टोले लगावले आहेत.

मागच्या आठवडयात निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र पोस्ट केले होते. त्यामध्ये वाघाने एका हातामध्ये कमळ पकडले होते तर घडयाळ गळयामध्ये होते. कमळ भाजपाचे तर घडयाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक चिन्ह आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने जो कौल दिलाय त्यामुळे सत्ता स्थापनेच्या चाव्या शिवसेनेच्या हातात असल्याचा संदेश राऊत यांनी या व्यंगचित्राच्या माध्यमातून दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 4:28 pm

Web Title: if you are the tiger fadnavis is ringmaster bjp spokeperson tweet over cm row dmp 82
Next Stories
1 मी पुन्हा सांगतो भाजपा – शिवसेनेच्या नाटकात काँग्रेसने पडू नये : संजय निरुपम
2 संजय राऊत यांना शिवसेनेकडून अधिकृतपणे बोलण्याचा अधिकार नाही -प्रसाद लाड
3 ‘बाळासाहेब! तुम्ही ज्या मराठी मुलांसाठी भांडलात त्यांना कामच करायचं नाही’