एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी ओवेसी यांनी हिंदूराष्ट्राच्या मुद्यावरून सरकारवर हल्ला चढवला. तसेच तिहेरी तलाकमुळे मुस्लिम महिलांना न्याय मिळाला हा अंदाज चुकीचा आहे. मोदीजींना मुस्लिमांना न्याय द्यायचा असेल तर त्यांनी मराठा समाजाप्रमाणे आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा,” असं आवाहन ओवेसी यांनी केलं आहे.

विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचा दिवस जवळ असल्याने प्रचार शिगेला पोहोचला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची कल्याणमध्ये प्रचारसभा झाली. यावेळी खासदार ओवेसींनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, “देशाला एकच रंग देण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. पण आम्ही सेक्युलर भारताला कधीच हिंदूराष्ट्र होऊ देणार नाही.

“भारताच्या तिरंग्यात हिरवा रंग असला, तरी सत्ताधाऱ्यांना मात्र हिरवा रंगाचा तिरस्कार आहे. त्यामुळे आरएसएसच्या अजेंड्यानुसार भारताला हिंदूराष्ट्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात आज मुस्लिम समाज शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास राहिला आहे. तिहेरी तलाक कायदा आणल्याने मुस्लिम महिलांना न्याय मिळाला, असं जर मोदींना वाटत असेल तर त्यांचा समज चुकीचा आहे. मोदींना जर खरच महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्यांनी मराठा समाजाप्रमाणे आरक्षण द्यावे,” असं आवाहन ओवेसी यांनी केलं आहे.

ही जमीन माझ्या बापाची

“मेल्यानंतर मला औरंगाबादला दफन करावं अशी इच्छा मी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. त्यावर उद्धव ठाकरेंनी त्यावर टीका केली. भारतात माझ्या वडिलांचा जन्म झाला. त्यामुळे ही जमीन माझ्या बापाची आहे,” असं उत्तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं. तसेच पत्री पूल आणि खड्डे, त्यामुळे गेलेले बळी या स्थानिक मुद्यांवरून त्यांनी निशाणा साधला. मोदींना चंद्रावरचे खड्डे बघण्यात रस आहे, मात्र इथे पृथ्वीवर किती खड्डे आहेत. त्यामुळे किती बळी जात आहेत. हे कोण पाहणार, असा सवाल त्यांनी केला.