विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज अखरेचा दिवस आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची एकत्र निवडणुक लढवण्याची चिन्ह आहेत. औरंगाबादमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या भेटीत ओवेसी वंचितच्या पदाधिकाऱ्यांना म्हणाले, “आम्ही वंचितसोबत केवळ निवडणुकीसाठी आघाडी केली नव्हती. मी प्रामाणिकपणे बाळासाहेबांना खाद्यांवर उचलून घेतले होते. आजही माझी त्यांना खांद्यावर उचलून घेण्याची तयारी आहे. तुम्ही बाळासाहेबांना (प्रकाश आंबेडकर) समजवा,” असं ओवेसी यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणूक एकदिलाने लढणाऱ्या एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी समाधानकारक जागा न दिल्याने वेगळे होत आहोत असं एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं होतं. दरम्यान, आघाडीसाठी तयार असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे.

दरम्यान, एमआयएमने औरंगाबादमधील तिन्ही मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यांच्या प्रचारासाठी ओवेसी औरंगाबादेत आले होते. त्यांची बुधवारी सभा झाली. त्यानंतर गुरूवारी सकाळी त्यांची वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी ओवेसी म्हणाले, “आजही वंचितसोबत आघाडी करायला तयार आहे. बाळासाहेबांना कोण काय बोलले हे मला माहिती नाही. तुम्ही त्यांना समजवा. औरंगाबाद मध्य मधून आमचा विद्यमान आमदार आहे. असे असताना आम्ही ती जागा कशी सोडणार. शहरात वंचितचा आमदार हवा ही मागणी रास्त आहे. त्यासाठी आम्ही पश्चिमची जागा सोडण्यास तयार होतो. या जागेवरूनही जलील माझ्याशी भांडले. पण, मी त्यांची समजूत काढली. मी त्यांना म्हणालो आपल्याला वंचितसोबत आघाडी करायची आहे. पश्चिमची जागा द्यावी लागेल,” असं ओवेसी वंचितच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना म्हणाले.

…तर प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेवर पाठवू

“वंचित आघाडी आणि एमआयएमसोबत लढले तर राज्यात दोन्हींचे मिळून १५ आमदार निवडून येतील. त्यानंतर इतरांचा पाठिंबा घेऊन आपण प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेवर पाठवू शकतो. माझ्या मनात काहीच नाही. तुम्ही तुमचं मन साफ ठेवा. औरंगाबाद मध्य मधून माघार घ्यायला लावा,” असं ओवेसी म्हणाले.