पुणे जिल्हा आधी काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड म्हणून ओळखला जायचा. पण मागच्या पाच वर्षात पुण्यामध्ये भाजपाने आपले स्थान बळकट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा पुण्यामध्ये जोरदार मुसंडी मारण्यासाठी प्रयत्न करत आहे. खडकवासला, वडगाव शेरी आणि हडपसर या तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसची मदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि पक्षाध्यक्ष शरद पवार या तीन विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत.

पुणे महापालिकेत दहा वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. पण २०१४ पासून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची घसरण सुरु झाली. अजित पवार यांनी वडगाव शेरीमध्ये रोड शो केला. शरद पवारांची हडपसरमध्ये सभा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसला या तिन्ही मतदारसंघात बंडखोरांना शांत करण्यात यश आले. अन्यथा मतविभाजन अटळ होते. पण हडपसरमध्ये राष्ट्रवादीला मनसेबरोबर हातमिळवणी करता आली नाही.

मनसेने इथून विद्यमान नगरसेवक वसंत मोरे यांना उमेदवारी दिली आहे. कात्रज, कोंढवा भागात वसंत मोरे यांची बऱ्यापैकी पकड आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात भाजपा, राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये तिरंगी लढत आहे. २००९ मध्ये वडगाव शेरीची जागा राष्ट्रवादीने जिंकली. पण २०१४ मध्ये भाजपा उमेदवाराने इथून विजय मिळवला. भाजपा आमदारांच्या खराब कामगिरीमुळे नव्हे तर लोकांना नवीन चेहरा हवा असल्यामुळे या तीन मतदारसंघात राष्ट्रवादीला विजयाची संधी असल्याचे सूत्रांनी सांगितले. २०१९ लोकसभा निवडणुकीत शिरुरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली. अमोल कोल्हे इथून खासदार असल्यामुळे हडपसरमध्ये राष्ट्रवादीची कामगिरी चांगली होण्याची शक्यता आहे.