|| नीरज राऊत

विलास तरे दहावीवरून सातवी; मालमत्तेत लक्षावधींची वाढ:- बोईसर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विलास तरे यांच्या मालमत्तेत गेल्या दहा वर्षांत लक्षावधींची वाढ झाली असली तरी त्यांची शैक्षणिक पात्रतेत मात्र घसरण झाली आहे. २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जात दहावी उत्तीर्ण असा उल्लेख करणाऱ्या तरे यांनी यंदा मात्र आपण सातवी उत्तीर्ण असल्याचे दाखवले आहे. तीनही निवडणुकी वेळी प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती सादर केल्याने त्यांच्या विरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे.

विलास तरे यांनी २००९ची निवडणूक बहुजन विकास आघाडीतर्फे लढवली होती. त्यावेळी त्यांनी जंगम मालमत्ता ३१ हजार रुपये तर स्थावर मालमत्ता चार लाख रुपये दाखवली होती. नऊ  लाख रुपयांची देयके असल्याचेही प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. २०१४ च्या निवडणुकीत जंगम मालमत्ता २३.६७ लक्ष तर स्थावर मालमत्ता ५.४२ लक्ष इतकी दाखवण्यात आली होती. यावेळीही त्यांच्यावर सात लक्ष रुपयांचे दायित्व होते. शिवसेनेच्या तिकिटावर २०१९मध्ये निवडणूक लढवताना विलास तरे यांनी आपली जंगल मालमत्ता ४०.१५ लक्ष, आपल्या पत्नीची  जंगम मालमत्ता २१.३३ लक्ष तर मुलाची दहा लक्ष इतकी दाखवली आहे. त्याचबरोबरीने त्यांची स्थावर मालमत्ता एकूण ६९.७१ लक्ष रुपये दाखवण्यात आली आहे. शेती व्यापार आणि आमदार वेतन हे त्यांचे उत्पन्नाचे साधन असून त्यांच्यावर सध्या कोणत्याही दायित्व नसल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

२००९ मध्ये विलास तरे यांनी पुणे विद्यापीठातून १९९५ मध्ये शालांत परीक्षा (एसएससी) उत्तीर्ण केल्याचे नमूद केले होते. २०१४ मध्ये मनोर येथील गिरिजन हायस्कूल या शाळेतून १९९२-९३मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्याचा उल्लेख त्यांनी प्रतिज्ञापत्रात केला होता. २०१९च्या निवडणुकांमध्ये मध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वातंत्र्यसैनिक नरोत्तम लक्ष्मण पाटील माध्यमिक विद्यालय, सातिवली येथून १९८९मध्ये सातवी उत्तीर्ण झाल्याचे नमूद केले आहे. प्रत्येक निवडणूक प्रतिज्ञापत्रात वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आणि वेगवेगळय़ा शैक्षणिक संस्थांची माहिती दिल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात विलास तरे यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याकडे शिक्षण घेतल्याचा अखेरचा दाखला सातिवली येथील शाळेचा उपलब्ध झाल्याने त्याप्रमाणे शैक्षणिक अहर्ता प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याचे त्यांनी सांगितले.

राजेश पाटील श्रीमंत उमेदवार

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील हे  जिल्ह्यतील सर्वात श्रीमंत उमेदवार असून त्यांच्या नावे एक कोटी सात लाख रुपयांची, त्यांच्या पत्नीकडे ३५.७८ लाख आणि मुलाकडे अडीच लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांची २.०८ कोटी रुपये, पत्नीची १.३०कोटी रुपये स्थावर मालमत्ता आहे.