नेवासा मतदारसंघातील नवनिर्वाचित अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठींबा दिला आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत त्यांनी सोमवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांना पाठींब्याचे पत्र दिले. यामुळे आता शिवसेनेचे संख्याबळ वाढले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार असलेले शंकरराव गडाख हे अपक्ष निवडून आले आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठींबा जाहीर केला होता. दरम्यान, मिलिंद नार्वेकर यांनी पाडव्यानिमित्त माजी खासदार यशवंतराव गडाख आणि आमदार शंकरराव गडाख यांची सोनई येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे शंकरराव गडाख शिवसेनेला पाठींबा देतील अशी चर्चा सुरु झाली होती.

सोनईमध्ये नार्वेकर यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे उद्धव ठाकरेंशी फोनवरुन संभाषण घडवून आणले. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी गडाख यांना शिवसेनेसोबत येण्याची ऑफर दिली. ही ऑफर स्विकारत शिवसेनेला पाठींबा देण्याचा निर्णय गडाख यांनी घेतला. त्यानंतर शंकरराव गडाख आणि त्यांचे बंधू प्रशांत गडाख यांनी मुंबईत मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यांना पाठींब्याचे अधिकृत पत्र दिले. शिवसेनेला पाठींबा देणारे शंकरराव गडाख हे पाचवे अपक्ष आमदार आहेत. त्यांच्या पाठींब्यामुळे आता शिवसेनेचे संख्याबळ ६१ वर पोहोचले आहे.

दरम्यान, शिवसेनेला पाठींबा दिल्यानंतर शंकरराव गडाख म्हणाले, “निवडणुकीनंतर अनेक पक्षांनी आपल्याशी संपर्क साधलe. मात्र, आपल्या भागातील प्रश्न सत्ताधाऱ्यांसोबत राहूनच सोडवता येणार असल्याने आपण शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला.”