जागतिक मंदीच्या संकटातून भारताला सावरणार, अशी ग्वाही देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचारसभेत देशात मंदी असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली.

पूर्व विदर्भातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी यांची रविवारी साकोली येथे सभा झाली, त्यात ते बोलत होते. ‘सहा महिन्यांपूर्वी आपण पुन्हा निवडून दिलेले सरकार नव्या ऊर्जेने भारत निर्माणाचे कार्य करीत आहे. ही वेळ जागतिक मंदीची असून, वेळोवेळी असे प्रसंग जगावरओढवत असतात. या जागतिक मंदीतून भारताला सावरण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले असून, मंदीतून देश बाहेर निघेल, असे मोदी म्हणाले. जनतेने दुसऱ्यांदा मोठय़ा बहुमताने दर्शवलेला विश्वास आम्हाला कठोर आणि मजबूत पाऊल उचलण्यास प्रेरक ठरत आहे, असे मोदी म्हणाले.

पाच वर्षांपूर्वी ऑक्टोबर महिन्यातच राज्यासाठी आशीर्वाद मागायला आलो होतो. त्या वेळी आपण आम्हाला राज्यात सरकार स्थापन करण्याची संधी दिली. आता पुन्हा स्थिर आणि सक्षम नेतृत्वाचे सरकार महाराष्ट्रात आणण्याची संधी द्या, असे आवाहन करीत मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. देवेंद्र फडणवीस यांच्या रूपात राज्याला एक युवा नेतृत्व मिळाले आहे. त्यांनी महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्याचे काम केले. त्या वेळी आपण दिलेला कौल ‘ट्रेलर’ होता. आता आपण पूर्ण चित्रपट दाखवणार, असा विश्वास मला तुमची आजची उपस्थिती पाहून वाटते, असे मोदी म्हणाले. पुढील पाच वर्षांत सिंचन सुविधांसह प्रत्येक घरात पाण्याची सोय केली जाईल. येत्या काळात गावांच्या विकासासाठी २५ लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, असे मोदी म्हणाले.

गोंदिया-भंडारा जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात झालेल्या बंडखोरीवर मोदी भाष्य करतील, असा अंदाज होता. मात्र, त्याबाबत भाष्य करणे त्यांनी टाळले. जागावाटपात झालेला गोंधळ आणि अन्याय लक्षात आणून देण्यासाठी दोन्ही जिल्ह्य़ांतील बंडखोर उमेदवारांनी सभास्थळी जाऊन पंतप्रधान मोदींना काळे झेंडे दाखवणार, असा इशारा दिला होता. त्यामुळे सभास्थळी तपासणी पथकाद्वारे काळा शर्ट, काळा टी-शर्ट, काळा रुमाल, काळा स्कार्फ आदी कोणतीही काळी वस्तू आत घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली होती.

अर्थव्यवस्थेबाबत भागवत अन् मोदी : विजयादशमी मेळाव्यात बोलताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आर्थिक मंदीची चिंता करण्याची गरज नाही, असे वक्तव्य केले होते. आर्थिक मंदीचा बाऊ करून समाजात एक प्रकारचे भीतीचे वातावरण तयार केले जात असल्याची टीका त्यांनी केली होती. आता मोदी यांनी मंदीबाबत अधिक भाष्य केलेले नसले तरी दिलेली मंदीची अप्रत्यक्ष कबुली ही लक्षणीय बाब मानली जाते.

अनुच्छेद ३७० बाबत विरोधकांना आव्हान

विरोधकांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात द्यावे, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जळगावमधील प्रचारसभेत दिले. अनुच्छेद ३७० वरून विरोधक राजकारण करत आहे. अनुच्छेद ३७० हटविल्याने शांतता नांदण्याची चिन्हे निर्माण झाली असताना, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची वक्तव्ये आणि एकूण भूमिका पाहता शेजारच्या देशाशी त्यांचे लागेबांधे असल्याचा संशय येतो, असा आरोपही मोदी यांनी केला. काश्मीर पूर्वपदावर येण्यासाठी चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागणार नाही, असेही मोदी म्हणाले.