31 May 2020

News Flash

राजकारणाला वाईट म्हणण्यापेक्षा वाईट राजकारण्यांना बाजूला सारा

आम्हाला राजकारणात रस नाही असे म्हणून लोक राजकारणापासून दूर जातात. राजकारण इतके घाणेरडे असेल तर देशातूनच हद्दपार करा ना.

लडाखचे खासदार जम्यांग त्सेरिंग नामग्याल यांची परखड भूमिका

‘आम्हाला राजकारणात रस नाही असे म्हणून लोक राजकारणापासून दूर जातात. राजकारण इतके घाणेरडे असेल तर देशातूनच हद्दपार करा ना.. दोन राजकारणी वाईट म्हणून संपूर्ण राजकीय व्यवस्था, राजकीय ज्ञानक्षेत्राला वाईट ठरवणे योग्य आहे?’ असा सवाल लडाखचे खासदार जम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनी बुधवारी उपस्थित केला. ‘राजकारणाला घाणेरडे म्हणण्यापेक्षा, वाईट राजकारण्यांना बाजूला सारल्याशिवाय देश स्वच्छ होणार नाही,’ अशी स्पष्ट भूमिकाही नामग्याल यांनी मांडली.

पुणे-लडाख नव्या मैत्रीपर्वाचा प्रारंभ नामग्याल यांच्या उपस्थित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. खासदार गिरीश बापट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य राजेश पांडे, संवाद पुणेचे सुनील महाजन, महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले, तर पायलवृंदतर्फे लडाखी नृत्य सादर करण्यात आले.

‘राजकारण हा घाणेरडा खेळ असल्याची भीती दुसऱ्याच्या प्रवेशाने घाबरणाऱ्या लोकांनी निर्माण केली आहे. कितीही टाळले तरी राजकारण प्रत्येकाच्या आयुष्यात प्रभाव टाकते. साधे ओळखपत्र हाही राजकीय धोरणाचाच भाग असतो. विचार आणि पक्ष वेगळा असू शकतो; पण भारतात राहणाऱ्या लोकांचा देश वेगळा कसा असेल? समाजमाध्यमांमुळे देश चालत नाही. समाजमाध्यमांत व्यक्त व्हा, पण बाहेर पडून रस्त्यावरही काम करा,’ असे नामग्याल म्हणाले.

स्वीय सहायक खासदार का होऊ शकत नाही?

कार्यक्रमात नामग्याल यांना गिरीश बापट यांच्या हस्ते पुणेरी पगडी घालण्यात आली. ‘पुण्यात टोपी घालणारे खूप आहेत. मीही टोपी घातली. माफ करा पगडी घातली,’ अशी कोटी करून बापट म्हणाले, ‘खासदार म्हणून पहिल्याच दिवशी ओळखपत्र काढताना नामग्याल यांची ओळख झाली. आधीच्या खासदारांचे स्वीय सहायक म्हणून काम करणाऱ्या नामग्याल यांनी खासदार झाल्यावर पहिल्याच भाषणात शतक ठोकले.’ त्यानंतर नामग्याल यांनी बापट यांना कोपरखळी मारली. ‘सहायक प्राध्यापकाचा प्राध्यापक होऊ  शकतो, तर स्वीय सहायक खासदार का होऊ  शकत नाही? बापट साहेब स्वीय सहायकापासून जपून राहा.. आता प्रत्येकाचे ‘अच्छे दिन’ आले आहेत,’ असे नामग्याल यांनी सांगताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

लडाखला जाणून घ्या..

पहिल्यांदाच पुण्यात आल्याचे सांगत नामग्याल म्हणाले, या मैत्रीपर्वामुळे लडाखला वेगळी ओळख मिळेल. अनेक लोक येतात, फिरतात; पण लडाखला जाणून घेत नाहीत. लडाखला जाणून घ्या. लडाखमध्ये घरजावई झालेल्याचा अपमान केला जात नाही किंवा हुंडा घेतला जात नाही. आमच्याकडेही शिकण्यासारखे खूप आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 4:24 am

Web Title: instead of calling politics bad politicians aside akp 94
Next Stories
1 झोपडपट्टीवासीय, स्थानिक रहिवाशांचा कौल महत्त्वाचा
2 कॅन्टोन्मेंटमधील लढत भाजप-काँग्रेससाठी प्रतिष्ठेची
3 world mental health day : आत्महत्या टाळण्यासाठी गरजूंना द्या मदतीचा हात
Just Now!
X