राज्यामध्ये विधानसभेचा निकाल लागून तीन आठवडे झाल्यानंतरही सत्तेस्थापनेचा तिढा सुटलेला नाही. त्यातच राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकी मुंबईमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरु आहेत. किमान समान कार्यक्रमावर एकमत होण्यासंदर्भात चर्चा सुरु असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. एकीकडे सत्ता स्थापनेसाठी राज्यातील प्रमुख पक्षांपैकी तीन पक्ष प्रयत्न करत असतानाच अचानक मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक बड्या कलाकारांनी ट्विटवर #पुन्हानिवडणूक? हा हॅशटॅग वापरुन ट्विट केले आहे. मात्र अनेकांना हा हॅशटॅग पटलेला नसून त्यावरुन टीका केली आहे. कलाकारांनी राजकारणात पडू नये असा सल्ला अनेकांनी कलाकारांना दिला आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन होणार की मध्यवर्ती निवडणूक होणार यासंदर्भात राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगल्या आहेत. त्याच आज अनेक मराठी कलाकारांनी केवळ #पुन्हानिवडणूक? इतकंच ट्विट केलं आहे. यामध्ये सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी या कलाकारांचा समावेश आहे. काँग्रेसने भाजपा आयटी सेलच्या माध्यमातून मुद्दा कलाकारांच्या मदतीने पुन्हा निवडणूक घेण्यासंदर्भातील हा हॅशटॅग चालवला जात असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटवरुन याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. असं असलं तरी काँग्रेसने आक्षेप घेण्याआधीच नेटकऱ्यांनीच कलाकारांना सुनावले आहे.

नक्की वाचा >> कलाकारांचा ‘पुन्हा निवडणुकीचा सूर’; काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

एकीकडून या कलाकारांवर टीकेचा भडीमार होत असला तरी हा हॅशटॅग म्हणजे धुरळा नावाच्या आगामी सिनेमाचे प्रमोशन असल्याचे समजते.