News Flash

‘इंटक’ची काँग्रेसकडे सात मतदारसंघांची मागणी

विधानसभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ व मित्रपक्ष ३८ जागा लढवण्याची चर्चा आहे.

अकोला : काँग्रेसप्रणीत इंटकने (इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस) सात मतदारसंघांत कामगार संघटनेच्या नेत्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली असून त्यात विदर्भातील सहा जागांचा समावेश आहे.

विधानसभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ व मित्रपक्ष ३८ जागा लढवण्याची चर्चा आहे. काँग्रेसमध्ये कामगारांचे प्रमुख संघटन असलेल्या इंटकनेही आता सात जागांवर दावा केला. या संदर्भात पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजीव रेड्डी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना इंटकचे राज्याचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी पत्र दिले. त्यामध्ये सात जागांवर इंटक नेत्यांची नावे सुचवली आहेत. डॉ. संजीव रेड्डी यांनीही बाळासाहेब थोरात यांना पत्र देत इंटकला प्रतिनिधित्व देण्याची विनंती केली.

इंटकने अकोला पश्चिम, नागपूर पूर्व किंवा दक्षिण, भंडारा जिल्हय़ातील साकोली किंवा तुमसर, वर्धा, यवतमाळ जिल्हय़ातील वणी, बुलढाणा जिल्हय़ातील मेहकर या विदर्भातील सहा व औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात उमेदवारी देण्याची मागणी केली.

गेल्या निवडणुकीत दोन जागा

२०१४ मध्ये काँग्रेस स्वबळावर लढली होती. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने राज्यात दोन जागांवर इंटकच्या नेत्यांना उमेदवारी दिली होती. अपेक्षेपेक्षा कमी प्रतिनिधित्व मिळाल्याने या वेळेस सात जागांवर दावा करण्यात आल्याचे इंटक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी देताना इंटकला प्रतिनिधित्व मिळण्यासाठी सात जागांची मागणी करण्यात आली. त्यासाठी इंटक नेत्यांची नावेही सुचवण्यात आली आहेत.

– जयप्रकाश छाजेड, अध्यक्ष, इंटक, महाराष्ट्र

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 3:23 am

Web Title: intuc demands seven constituencies from congress zws 70
Next Stories
1 बनावट नोटांप्रकरणी  एकास अटक
2 पोलिसांचा ‘फेसबुक’द्वारे जनतेशी संपर्क
3 पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार
Just Now!
X