शिवसेनेला २४ तासात सत्ता स्थापनेचा दावा करता न आल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलं आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक दुपारी चार वाजता होत आहे. पण, शरद पवार यांनी बैठक होणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. कुणी सांगितलं बैठक आहे, असा प्रतिप्रश्न उपस्थित करत त्याविषयी मला काही माहिती नाही, अशी गुगली पवार यांनी टाकली आहे.

शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून निमंत्रण मिळाल होतं. शिवसेनेनं बहुमताच्या आकड्याची जुळवाजुळव करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे मदत मागितली होती. मात्र, काँग्रेसनं वेळेत समर्थन न दिल्यानं शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही.

आता राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेच आमंत्रण मिळालेलं असून, राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात सुरू आहे. तर दुपारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनीच सकाळी ही माहिती दिली होती. पण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे वृत्त फेटाळले आहे.

शरद पवार यांनी सकाळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची लिलावती रुग्णालयात भेट घेतली. तत्पूर्वी माध्यामांशी पवार यांनी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक होणार आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना पवार म्हणाले, “कुणी सांगितलं अशी काही बैठक होणार आहे. मला काही माहिती नाही,” असं सांगत पवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीतील चर्चेविषयी सस्पेन्स तयार केला.

काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्लीत बैठक होणार होती. मात्र, ऐनवेळी ही बैठक रद्द करण्यात आली आहे. आता सर्व नेते मुंबईकडे रवाना झाले असून, मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात चर्चा होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचं आमंत्रण असलं तरी शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय दावा करता येणार नाही, अशीच स्थिती राज्यात आहे. अजित पवार यांनीही याबद्दल बोलताना हे अधोरेखित केलं होतं.