राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असताना प्रत्यक्षात सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी अद्यापही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. तर,राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत सोमवारी झालेल्या बैठकीत राज्यातील सत्तास्थापनेवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा करत सगळ्यांना बुचकळ्यात टाकलं आहे. हे पाहता राज्यात महाशिवआघाडीच्या संभाव्य सरकारबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ”सरकार बनवण्यास वेळ लागत असतो” असं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

राज्यातील सत्तास्थापनेसाठी तुम्ही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतची कालमर्यादा ठरवली होती?  या प्रश्नावर उत्तर देताना ”सरकार बनण्यास वेळ लागत असतो. सर्वसामान्य परिस्थितीत असं होत नाही. मात्र जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू असते तेव्हा आपल्याला बर्‍याच प्रक्रियांमधून जाण्याची आवश्यकता असते.” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

मागील आठवड्यात सामायिक कार्यक्रम ठरवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकत्रित बैठक वांद्रे येथे पार पडली. बैठकीनंतर एकनाथ शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी सामायिक कार्यक्रम ठरला असून त्यावर अंतिम निर्णय आपल्या पक्षाचे प्रमुख घेतील असं सांगितलं होतं. त्यामुळे शरद पवार सोमवारी सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर सत्तास्थापनेवर बोलतील अशी अपेक्षा होती. पण शरद पवार यांनी सामायिक कार्यक्रमावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये कोणतीच चर्चा झाली नसल्याचं सांगितल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.