राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र आणि राज्यातील सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले. “मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून कांद्याच्या दरात वाढ केली होती. त्यावेळी भाजपाचे एक खासदार गळ्यात कांद्याची माळ घालून आले होते. त्यावेळी लोकसभा अध्यक्षांना म्हणालो, शेतमालाला योग्य दर मिळाला पाहिजे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला. विरोधकांना कांद्याच्या माळा घालू द्या नाहीतर कवड्याच्या…,” असं सांगत पवारांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.

शरद पवार यांची अकोल्यात प्रचारसभा झाली. यावेळी बोलताना पवार यांनी आघाडी सरकारच्या काळातील निर्णय सांगत मोदी आणि फडणवीस सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केला. शरद पवार म्हणाले, “राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. मी म्हणालो, माजा पाठिंबा आहे, पण कर्जमाफी सरकट द्यायला हवी. पुढे काय झालं. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. शेतकरी आत्महत्या उगाच होत नाही. संसार कसा चालवायचा यापासून असंख्य अडचणी शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहेत. त्यामुळे आत्महत्या होत आहेत. त्यामुळे शेतकरविरोधकांना जागा दाखवून द्या,” असे आवाहन पवार यांनी केले.

केंद्राच्या कांद्याच्या निर्यात बंदीवर टीका करताना शरद पवार म्हणाले,”कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळावा, म्हणून आघाडी सरकारने दर वाढवले. याविरोधात भाजपाचे एक खासदार गळ्यात कांद्याची माळ गळ्यात घालून आले. लोकसभा अध्यक्षांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांनी कारण विचारलं तेव्हा भाजपाचे खासदार म्हणाले, शरद पवारांमुळे महागाई वाढणार आहे. त्यावर मी लोकसभा अध्यक्षांना म्हणालो, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे. काळ्या आईची सेवा करणारा शेतकरी अनेक संकटांना तोंड देतो. कधी पाऊस येतो कधी येत नाही. त्याचबरोबर नैसर्गिक संकटांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यांना कांद्याच्या माळा घालू द्या नाहीतर कवड्याच्या… अशी भूमिका घेणं गरजेचे असते,”असं पवार म्हणाले.

पुढे बोलताना पवार म्हणाले, “राज्य पुढे न्यायचं असेल तर शेतीबरोबर उद्योगधंद्यांचा विकास झाला पाहिजे. पण सरकारचे निर्णय झटके देणारे आहेत. एक दिवस अचानक देशाच्या पंतप्रधानांनी घोषणा केली, ‘आजपासून पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटांचे कागद होतील.’ काय माणूस आहे. सामान्य माणसाला वाटलं. मोठं घबाड बाहेर पडेल, पण जेव्हा सामान्यमाणसाला झटका बसला तेव्हा त्यांना कळलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अवघा देश रांगेत उभा होता. शंभर जणांचा मृत्यु झाला. जेट एअरवेज बंद झाली. अनेक कर्मचारी बेरोजगार झाले. कसे निर्णय घेतात. शेतकरी संकटात, उद्योग संकटात, तरुण संकटात,” असा सवाल पवार यांनी केला.