‘एमआयएम’चा ‘जयमीम’बरोबरच ‘जयभीम’चा नारा

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद</strong>

लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लीम ऐक्याचा धागा फक्त औरंगाबादमध्येच टिकला. तो विधानसभा निवडणुकीत कमकुवत झाला आहे की तुटला आहे, यावर येथील लढतीची गणिते ठरणार आहेत. या वेळी एमआयएम ३५ ते ४० जागांवर उमेदवार उभे करणार आहे. तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.

औरंगाबादमध्ये बुधवारी ‘एमआयएम’चे नेते असदोद्दीन ओवेसी यांच्या सभेत ‘जय भीम’ आणि ‘जय मीम’च्या घोषणा दिल्या जात होत्या. त्याच्या दुसऱ्या दिवशी औरंगाबाद पूर्वमधून निवडणूक लढविणारे उमेदवार गफ्फार कादरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काढलेल्या मिरवणुकीत विमल अवसरमल या विजयनगर भागात राहणाऱ्या दलित महिलेला आवर्जून प्रचारवाहनावर घेण्यात आले. ‘जय भीम’ ही घोषणा जोरजोरात देण्याचे, प्रयत्न केले जात होते; पण याच मिरवणुकीतील एक महिला म्हणाली, ‘‘आम्हाला बाळासाहेब आंबेडकर जे सांगतील, त्यांनाच आम्ही मतदान करू.’’

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची पहिली जाहीर सभा बुधवारी एमआयएमचे अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी यांनी घेतली.  ते म्हणाले, ‘‘आता इथून पुढे ‘जय भीम’ आणि ‘जय मीम’चा नारा अधिक बुलंद करायचा आहे.’’ ती घोषणा त्यांनी उपस्थितांना द्यायला लावली आणि त्यापुढची घोषणा होती ‘नारा-ए-तकबीर’.

दलित-मुस्लीम ऐक्याची घोषणा ज्या औरंगाबादमधून ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांनी केली होती, ती घोषणा देण्यासाठी आंबेडकर आता ओवेसी यांच्यासोबत नाहीत. हा संदेश मतदारांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचविण्यात आलेला आहे. मिरवणुकीत सहभागी झालेल्या विमल अवसरमल यांना आवर्जून प्रचारवाहनावर बोलावून घेणे हा दलित मते एमआयएमकडे वळावीत, यासाठी केलेला छोटासा प्रयत्न होता.

दलित मतदारांमधून एमआयएमला किती साथ मिळेल, याविषयी शंका उपस्थित होत असताना जाहीर करण्यात आलेल्या ३१ जागांपैकी सहा उमेदवार अनुसूचित जातीतील असून एक उमेदवार धनगर, एक उमेदवार परीट समाजातील असल्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी  सांगितले. आजही दलित मतदार एमआयएमबरोबर कायम असल्याचा दावा जलील करत होते. मिरवणुकांमध्ये निळा झेंडाही आवर्जून फडकवला जात होता. मात्र, याच मिरवणुकांमध्येही सहभागी झालेल्या आणखी काही महिलांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या मतानुसार ‘प्रकाश आंबेडकर सांगतील तसे’ या वाक्याचा आवर्जून उल्लेख केला जात होता.

ताकही फुंकून पीत आहोत : जलील

मराठवाडय़ासह राज्यात एमआयएम साधारण ३५ ते ४० जागांवर निवडणूक लढविणार आहे. खरे तर वंचित बहुजनकडे जागा मागताना त्यांनी १०० जागांचा प्रस्ताव दिला होता. याचा अर्थ ती मागणी अवास्तव होती, असे म्हणता येऊ शकेल. एवढय़ा जागा कमी कशा झाल्या या अनुषंगाने बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, ‘‘ज्या मतदारसंघात काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार अधिक ताकदीचा आहे, त्या मतदारसंघातील भाजप-सेनेची नेतेमंडळी एमआयएमचा उमेदवार त्या मतदारसंघात असावा, अशी आखणी करत आहे. त्यामुळे आम्ही ताकही फुंकून पीत आहोत.’’