लोकशाहीचा उत्सव सजमला जाणाऱ्या मतदानाच्या दिवशी  आज जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील बदनापुर मतदारसंघातील जामखेड या गावात, मतदान प्रक्रियेस गालबोट लागल्याचे पाहायला मिळाले. या ठिकाणी मतदान केंद्र ५ आणि ६ वर भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत जामखेड गावच्या उपसरपंचासह राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पोलिंग एजंट गंभीर जखमी झाले आहेत.

जालना जिल्ह्यातील दुपारी १ वाजेपर्यंतची मतदानाची मतदारसंघनिहाय टक्केवारी समोर आली आहे. यामध्ये परतुर – 32.72, घनसावंगी – 38.24, जालना- 30.74, बदनापुर – 38.48, भोकरदन- 38.60 तर एकूण जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी 35.76 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मिळालेली आहे.

या अगोदर सकाळी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा मतदारसंघाताली दहीटने गावात मतदान प्रक्रियेदरम्यान हाणामारीची घटना घडल्याचे समोर आली आहे. करमाळ्यातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण करण्यात आली आहे. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण झाल्याचा आरोप नारायण पाटील यांनी केला आहे.

तसेच, अमरावती जिल्ह्यातला मोर्शी विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला आणि गोळीबार झाल्याची देखील घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी साडेपाच वाजता देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोरांनी त्यांची गाडीही पेटवण्या आली आहे.