27 February 2021

News Flash

“आज आई असती तर तिला खूप आनंद झाला असता”, शपथविधीनंतर जयंत पाटील भावूक

"मी जयंत कुसूम राजाराम पाटील शपथ घेतो की..."

उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभर रंगलेला सत्तेच्या सापशिडीचा खेळ संपला. राज्यात अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीचे व मराठा समाजातील नेते जयंत पाटील यांनीदेखील शपथ घेतली. जयंत पाटील यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. शपथविधी झाल्यानंतर जयंत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत आज आई असती तर तिला खूप आनंद झाला असती अशी भावनिक पोस्ट केली आहे.

जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “महाराष्ट्राचा मंत्री म्हणून दिलेली जबाबदारी मी नम्रपणे स्वीकारतो. यापूर्वीच्या प्रत्येक शपथेनंतर आशीर्वाद द्यायला आई असायची. आज आई नाही, याची खंत आहे. ती असती तर तिला खूप जास्त आनंद झाला असता. आई जिथे कुठे असेल तिथून मला पाहून नक्कीच आशीर्वाद देत असेल”.

जयंत पाटील हे मुळचे इस्लामपूरमधील साखराळे गावचे आहेत. जयंत पाटील यांना वडिलांकडून राजकीय वारसा मिळाला आहे. स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. राजारामबापू पाटील काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. जयंत पाटील यांनी अमेरिकेत शिक्षण घेतलं आहे. वडिलांच्या निधनानंतर ते पुन्हा परतले आणि राजकारणात सक्रीय झाले. महाविकास आघाडीच्या सरकारमधील एक उच्चशिक्षित मंत्री म्हणून त्यांच्याकडे लक्ष असणार आहे. त्यांनी याआधी अर्थमंत्री, गृहमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली असल्याने त्यांच्यामागे प्रशासकीय कामांचा अनुभव आहे.

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून सलग सहा वेळा ते निवडून आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता म्हणून जयंत पाटील यांना ओळखलं जातं.

राष्ट्रवादी काँग्रेस कडून ओबीसी नेते छगन भुजबळ यांनाही संधी देत सामाजिक समतोल साधण्यात आला आहे. तर काँग्रेसने दोन निष्ठावंतांची निवड करताना थोरात यांच्या रूपाने मराठा समाजाला, तर विदर्भातील नितीन राऊत यांच्या रूपाने दलित समाजातील नेत्याला संधी देत संदेश दिला. उद्धव ठाकरे यांनी आपल्यासोबत एकनाथ शिंदे यांना शपथ देत विधिमंडळ गटनेत्यास, तर सुभाष देसाई यांच्या रूपाने ठाकरे घराण्याच्या विश्वासू व्यक्तीस संधी दिली.

उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांनी ईश्वरसाक्ष शपथ घेतली. छगन भुजबळ यांनी जय महाराष्ट्र-जय शिवराय अशी घोषणा देत शिवसेनेतील आपल्या इतिहासाला उजाळा देताना गांभीर्यपूर्वक शपथ घेताना महात्मा जोतिबा फुले, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण केले. शरद पवार यांचा उल्लेखही त्यांनी केला, तर नितीन राऊत यांनी तथागत गौतम बुद्ध यांना साक्षी ठेवून शपथ घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2019 8:36 am

Web Title: jayant patil remembers mother kusum rajaram patil maharashtra government oath ceremony sgy 87
Next Stories
1 “पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील लहान भावाला साथ द्यावी”
2 मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकरला कारची धडक, चौघांचा मृत्यू
3 भगव्या ध्वजाशी वैर घ्याल तर स्वत:चेच नुकसान कराल : शिवसेना
Just Now!
X