सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि सातारा-जावळी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मंगळवारी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी विजय संकल्प रॅलीद्वारे विराट शक्तीप्रदर्शन करीत आपआपले उमेदवारी अर्ज दाखल केले. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी सुमारे तीन आठवड्यांपूर्वी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देवून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. देशातील लोकसभेची ही पहिलीच पोटनिवडणूक आहे. याच रॅलीमध्ये उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांना त्यांच्या चाहत्यांनी चक्क कंदी पेढ्यांनी अभिषेक केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केल्यानंतर सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीबरोबरच होईल, अशी सूचना निवडणूक आयोगाने केल्यानंतर सातारच्या दोन्ही छत्रपतींनी लोकसभेची व विधानसभेची निवडणूक एकदिलाने लढविण्याचा निर्णय घेतला. माजी खासदार उदयनराजे भोसले व माजी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सातार्‍यात विराट शक्तीप्रदर्शन करीत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचा साताऱ्यातील प्रसिद्ध कंदी पेढ्यानी अभिषेख करण्यात आला. अनेक पराती भरुन पेढे या दोघांच्या डोक्यावरुन ओतण्यात आले. या आगळ्यावेगळ्या अभिषेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या अभिषेकावरुन नेटकऱ्यांमध्ये दुमत आहे. काहींनी याचे समर्थन केले आहे तर अनेकांनी हा अन्नाचा अपव्यय असल्याची टीका केली आहे.

भाजपा-शिवसेना व रिपाइंचे हजारो कार्यकर्ते यावेळी विजय संकल्प रॅलीमध्ये सहभागी झाले होते. सकाळी राजवाडा गांधी मैदानातून निघालेली ही रॅली पोलीस हेडक्वार्टरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय व प्रांत कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचली. . सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला, तर शिवेंद्रराजेंनी विधानसभेच्या उमेदवारीचा अर्ज प्रांत कार्यालयात दाखल केला.