पुण्यातील कोथरूड परिसरातील डहाणूकर कॉलनीतील मनसेचे कार्यालय अज्ञातांनी जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी २२ ऑक्टोबरला घडली होती, मात्र त्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर काल मध्यरात्री ती घटना उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांचे कोथरूड परिसारातील संपर्क कार्यालय २२ ऑक्टोबर रोजी अज्ञातांनी पेटवून दिले.हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी २५ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट अशून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हेमंत संभुस त्यांच्या सहकाऱ्यासोबत रात्री सव्वानऊपर्यंत कार्यालयात थांबले होते. हेमंत संभुस कार्यालयातून गेल्यानंतर अज्ञांनी ते पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पण स्थानिकांच्या हा प्रकार लक्षात आला. उपस्थित नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक दलाची गाडी तातडीने घटनास्थळी पोहचली व तिने आग पूर्णपणे विझविली.

कोथरुड मतदारसंघात चंद्रकांत पाटील आणि मनसेचे किशोर शिंदे यांच्यात लढत झाली होती. यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी किशोर शिंदे यांचा पराभव केला.