सत्तेसाठी लाचार होऊन पक्ष सोडणारे उद्या इतिहासजमा होतील, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोलापुरात राष्ट्रवादी सोडणाऱ्या नेत्यांवर टीका केली.

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडत पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी भाजप वा शिवसेनेत प्रवेश केला आहे.  पक्षाच्या या पडझडीच्या पार्श्वभूमीवर पवार सोलापुरात आले आहेत.

या वेळी माढय़ाचे माजी आमदार विनायक पाटील, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, सोलापुरातील माजी आमदार युन्नूसभाई शेख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळिराम साठे उपस्थित होते.

पवार म्हणाले, की राज्यात मागील पाच वर्षांत १६ हजार शेतक ऱ्यांनी नापिकी व कर्जथकबाकीमुळे आत्महत्या केल्या आहेत. परंतु राज्यकर्त्यांनी या शेतक ऱ्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. कर्जमाफीचा केवळ देखावा होत आहे.

आर्थिक मंदीमुळे हजारो कारखाने बंद पडून लाखो कामगार बेरोजगार होत आहेत. एवढेच नव्हे तर कोल्हापूर, सांगली भागात महापुरात हजारो कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले असताना त्यांच्या मदतीला धावून जाण्याऐवजी केवळ हेलिकॉप्टरमधून हवाई सफर करून गायब होण्याचे प्रकार राज्यकर्त्यांकडून घडले आहेत, अशा शब्दात त्यांनी टीका केली.

पंधरा वर्षांत या राज्यासाठी काय केले या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मागणीला टोला लगावताना पवार म्हमाले, की आपण सत्तेत असताना तुरुंगात जाण्याइतपत बरी-वाईट कामे केली नाहीत. ज्यांना गुन्हेगारी कृत्याबद्दल महिनाभर तुरुंगात राहावे लागले, त्यांनी काय केले, हे आम जनतेला माहीत आहे. आपण ८० वर्षांचे झालो तरी अजून लईजणांना घरी पाठवायचे आहे, असे सांगत आपण निश्चितपणे बाजी मारल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला.

पवारांच्या मेळाव्यालाही नेत्यांची दांडी

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार दिलीप सोपल, रश्मी बागल अशी अगोदरच मोठी गळती लागलेल्या राष्ट्रवादीमधील उरलेल्या नेत्यांमधीलही अनेकांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली. यामध्ये माढय़ाचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील माढय़ातील राष्ट्रवादीचे उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष  संजय शिंदे आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले माजी आमदार दीपक साळुंखे यांचा समावेश होता. यामुळे राष्ट्रवादीतील या उर्वरित नेत्यांच्याही पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे.