News Flash

अजित पवार नाही तर जयंत पाटीलच राष्ट्रवादीचे गटनेते, भाजपाला मोठा हादरा

जयंत पाटील यांचाचा व्हीप अधिकृत मानला जाणार

अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील

राज्यामधील राजकीय पेच अधिक गुंतागुंतीचा होत असतानाच राष्ट्रवादीला दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. विधिमंडळ गटनेते म्हणून विधिमंडळाच्या सचिवालयामध्ये जयंत पाटील यांचीच नोंद असल्याचे समजते. विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यामुळे गटनेतेपदी जयंत पाटील यांची नोंद असणे हा भाजपाला आणि अजित पवार यांना मोठा धक्का ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने विधिमंडळ गटनेतेपदाच्या निवडीचे पत्रच सोमवारी सचिवालयाकडे दिले आहे. या पत्रानुसार जयंत पाटील यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच आता जयंत पाटील यांचाचा व्हीप अधिकृत मानला जाणार आहे. विधिमंडळ गटनेत्याची निवड पक्षाध्यक्ष किंवा सरचिटणीस करतात. कोणत्या नेत्याची या पदी निवड झाली आहे याची माहिती 30 दिवसांमध्ये विधावसभा अध्यक्ष किंवा विधानभवन सचिवांना देणे बंधनकारक असते. भाजपाने विधिमंडळ पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्याचे तर शिवसेनेने गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केल्याचे पत्र सचिवांकडे दिले आहे. काँग्रेसने अद्याप आपला गटनेता निवडलेला नाही. मात्र तो कधी निवडावा यासाठी काही कालमर्यादा नसून तो हक्क पक्षाकडे राखीव असतो.

पक्षाने गटनेता निवडल्यानंतर राज्यपाल आणि विधिमंडळ यांना संयुक्तरित्या त्याबद्दल माहिती द्यावी लागेत. या दोन्ही वेगळ्या घटनात्मक संस्था असल्याने वेगवेगळ्या पत्रांद्वारे ही माहिती द्यावी लागते. पक्षाने राज्यापालांना आणि विधिमंडळाला दिलेल्या माहितीची देवणाघेवाण होत नाही. संबंधित प्रकरणामध्ये शनिवारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना राष्ट्रवादीचे गटनेता म्हणून राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा भाजपाला जाहीर करत पाठिंबा पत्रावर सही केली आहे. असं असलं तरी राष्ट्रवादीने अजित पवार पक्षाचे गटनेते असल्याची माहिती शनिवारपर्यंत अध्यक्षांना कळवली नव्हती. शनिवारीच अजित पवार यांची गटनेतापदावरुन हकालपट्टी करत जयंत पाटील यांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळेच विधिमंडळ गटनेता म्हणून अजित पवार नाही तर जयंत पाटील यांची नोंद विधिमंडळ सचिवांकडे आहे.

असं असलं तरी भाजपाने अजित पवार हेच राष्ट्रवादीचे गटनेते असल्याचा दावा केला आहे. जयंत पाटील यांच्या नावाने केवळ पत्र देण्यात आले असून त्याची नोंद करण्यात आलेली नाही असं भाजपाने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 8:56 am

Web Title: legislature secretary says jayant patil is the leader ncp in legislative assembly maharashtra scsg 91
Next Stories
1 “एक भगतसिंग देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेला आणि दुसऱ्याने…”, उद्धव ठाकरेंचा संताप
2 ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’, संजय राऊत यांचं सूचक ट्विट
3 ….असेच लोक शिवरायांच्या महाराष्ट्राच्या इज्जतीची अशी लक्तरे काढू शकतात – उद्धव ठाकरे
Just Now!
X