राज्यपालांना महाविकास आघाडीने दिलेलं पत्र म्हणजे तीन पक्षांची पागलपंती आहे असा टोमणा भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे. आज महाविकास आघाडीने राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचं पत्र दिलं. मात्र यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट केलेलं नाही. विधीमंडळाचे नेते म्हणून जयंत पाटील यांनी सही केली आहे. मात्र त्यांना सही करण्याचा अधिकार नाही. कारण अजित पवार हेच विधीमंडळ नेते आहेत. काँग्रेसने अद्याप त्यांचा नेताच निवडलेला नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर ही महाविकास आघाडीची पागलपंती आहे यात शंकाच नाही असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं.

आज राज्यपालांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भेटून १६३ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिलं. तसेच आम्हाला सत्तास्थापनेची संधी द्या अशीही विनंती करण्यात आली. मात्र या सगळ्यावर भाजपाने टीका केली आहे. हा सगळा प्रकार निव्वळ अस्वस्थ आमदारांना दिलासा देण्यासाठी तीन पक्ष करत आहेत असाही टोला आशिष शेलार यांनी लगावला.

आणखी वाचा- “आम्हाला सत्तास्थापनेची संधी द्या”, महाविकास आघाडीने सोपवलं १६२ आमदारांच्या सह्या असणारं पत्र

शनिवारी महाराष्ट्रातल्या राजकारणात हाय व्होल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. शुक्रवारी महाविकास आघआडीची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावावर सहमती झाल्याचे शरद पवार यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले आणि शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात मोठा ट्विस्ट यावेळी पाहण्यास मिळाला. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. आता आज महाविकास आघाडीचे नेते हे राज्यपालांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांनी १६२ आमदरांच्या सह्या असलेलं पत्रही राज्यपालांना सादर केलं. मात्र या पत्राला काहीही अर्थ नसल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे आणि महाविकास आघाडीची खिल्लीही उडवली आहे.