बदलापूर रेल्वे स्थानकात भाजप-राष्ट्रवादीचे उमेदवार आमनेसामने

दसऱ्याच्या आधीचा एक दिवस आधी दरवर्षी लोकलमध्ये मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. यंदा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांनी यात सहभागी होत प्रचाराची संधी साधली. मुरबाड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे किसन कथोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद हिंदुराव यांनी सकाळीच बदलापूर रेल्वे स्थानक गाठत प्रवाशांशी संवाद साधला. या वेळी स्थानकात दोन वेळा हे उमेदवार आमनेसामने आले.

सोमवारीही सकाळपासून स्थानकात प्रवाशांची लोकल सजवण्यासाठी लगबग सुरू होती. सकाळी ७ वाजल्यापासून ते ९ वाजेपर्यंतच्या विविध लोकलमधील महिलांनी या वेळी स्थानकात ठेका धरला होता. सोमवारचा हा मुहूर्त साधत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बदलापूर रेल्वे स्थानकात प्रचार केला. सकाळी सात वाजता भाजपचे किसन कथोरे यांनी लोकलपूजेत सहभाग घेतला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद हिंदुराव हेही लोकलपूजेत सहभागी झाले. दोन्ही उमेदवारांनी स्थानकात उभ्या लोकलमध्ये प्रवेश करत प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतला. अनेक प्रवाशांनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाढाच वाचला. बदलापूर स्थानकातील फलाट एक आणि दोन, तसेच फलाट तीनवर सुरू असेलल्या या प्रचाराच्या धावपळीत हे दोनही उमेदवार दोन वेळा एकमेकांसमोर आले. या वेळी किसन कथोरे यांनी राष्ट्रवादीच्या प्रमोद हिंदुराव यांना शुभेच्छा दिल्या, तर तुमच्या शुभेच्छा पूर्ण होवोत अशा प्रति शुभेच्छा हिंदुराव यांनी कथोरे यांना या वेळी दिल्या. येत्या काही दिवसांत एकमेकांविरोधात प्रचारात उतरणारे कार्यकर्तेही एकमेकांसमोर येत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव उत्सुकतेचा विषय बनला होता.