लोकसभा निवडणुकीमधील जोश विधानसभेत ओसरला;  ऊनपावसाच्या खेळाबरोबरच राजकीय सुंदोपसुंदीही कारणीभूत

अवघ्या चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर रांगा लावणाऱ्या मुंबईकरांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाबाबत मात्र निरुत्साह दाखवल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि सोमवारी सकाळी पाऊस आणि दुपारनंतर कडक ऊन अशा वातावरणामुळे मुंबईतील अनेक मतदान केंद्रांवर दुपापर्यंत तुरळक गर्दीच दिसून येत होती. मात्र, त्यासोबतच शिवसेना-भाजपमधील सुंदोपसुंदी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील मरगळ यांमुळे मतदारांनीही यंदा मतदानाकडे पाठ फिरवल्याचेही बोलले जात आहे. मात्र एकूणच मतदानाचा घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार, हे येत्या गुरुवारी स्पष्ट होईल.

विधानसभेच्या मागील निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपची युती संपुष्टात आली होती. उभय पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले होते. मात्र मोदी लाटेमुळे मुंबईमधील अमराठी मतदार मोठय़ा संख्येने मतदानासाठी उतरले होते. त्यामुळे सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. मात्र या वेळी अगदी उलट चित्र मतदान केंद्रांवर दिसत होते. मतदारांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे सोमवारी सकाळपासूनच मुंबईतील मतदारसंघांमध्ये संथ गतीने मतदान सुरू होते. काही अपवाद वगळता अन्य मतदान केंद्रांमध्ये गर्दीच दिसत नव्हती.

अखेरच्या क्षणी जाहीर करण्यात आलेली शिवसेना-भाजप युती, कमी जागा पदरात पडल्यामुळे नाराज झालेले शिवसैनिक, मित्रपक्षाला मिळालेल्या मतदारसंघामुळे उमेदवारीपासून वंचित राहावे लागलेल्यांमधील नाराजी, बंडखोरांविरुद्ध शिवसेनेने कोणतीच भूमिका न घेतल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये पसरलेला रोष या आणि अशा अनेक कारणांमुळे शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत होता. त्याचे पडसाद मुंबईतील मतदारसंघांमध्ये उमटताना दिसत होते. ‘मातोश्री’च्या अंगणातील वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करीत मतदारांना केलेल्या भावनिक आवाहनामुळे शिवसैनिकांचे धाबे दणाणले होते. वांद्रे पूर्वमधील मुस्लीम मतांचा जोगवा कुणाला मिळतो यावर अनेक समीकरणे अवलंबून असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू होती. तर भाजप उमेदवार मंगलप्रभाद लोढा निवडणूक लढवीत असलेल्या मलबार हिल मतदारसंघात शिवसैनिक रुसून बसले होते. भाजपचे उमेदवार निवडणूक लढवीत असलेल्या पश्चिम उपनगरांमधील मतदारसंघात शिवसैनिक, तर शिवसेनेचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांत भाजपचे कार्यकर्ते शांत बसून होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साहाचे वातावरण होते. अशा अंतर्गत कलहांमुळे बहुतेक राजकीय कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्याचे कष्ट यंदा घेतले नसल्याचे दिसून आले.

मुंबईच्या काही भागामध्ये रविवारी रात्री कोसळलेल्या पावसामुळे अनेक वस्त्या आणि मैदानांमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले होते. या वेळी मैदानांमध्ये मोठय़ा प्रमाणावर मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. पावसामुळे मैदानात झालेला चिखल तुडवत मतदारांना मतदानासाठी जावे लागत होते. त्यामुळे मतदारांकडूून नाराजी व्यक्त होत होती. राजकीय नाराजी आणि सुविधांमधील त्रुटींमुळे मतदानावर निरुत्साहाचे वातावरण दिसत होते. केंद्र बदलल्याने मतदारांचा गोंधळ

अवघ्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी असलेले मतदान केंद्राचे ठिकाण या निवडणुकीत बदलल्यामुळे अनेक ठिकाणी मतदारांचा गोंधळ झाला. यंदा मतदान केंद्र तळमजल्यावरच ठेवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. काही शाळांच्या परिसरात तळमजल्यावर मतदान केंद्रासाठी जागा नसल्यामुळे या वेळी केंद्राची जागा बदलली. लोकसभेच्या मतदान केंद्राच्या ठिकाणी नागरिक गेल्यावर दुसऱ्याच ठिकाणी केंद्र असल्याचे मतदारांना कळत होते. दुसरे केंद्रही दूर असल्यामुळे मतदारांचा विरस झाल्याचे दिसत होते.