News Flash

फडणवीस सरकार पडणार! ७७ टक्के वाचक म्हणतात ‘होय, हे शक्य आहे’

२७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचे सर्वोच्च न्यायलयाचा निर्णय

देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. राज्यामधील घोडेबाजार थांबवण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेणे गरजेचे असल्याचे सांगत न्यायलयाने उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या जनमत चाचणीमध्ये ७७ टक्क्यांहून अधिक जणांनी फडणवीस यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही असं मत व्यक्त केलं आहे.

राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शनिवारी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सकाळी अचानक झालेल्या या शपथविधीनंतर राज्यात मोठा राजकीय भुकंप झाला. त्यानंतर बहुमत सिद्ध करण्याची मागणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. याच पार्श्वभूमीवर लोकसत्ता ऑनलाइनने फेसबुक तसेच ट्विटरवर जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. फेसबुकवरील पोलमध्ये २५ हजारहून अधिक वाचकांनी आपले मत नोंदवले. त्यापैकी ७७ टक्के वाचकांनी फडणवीस सरकार पडणार असं मत व्यक्त केले. तर केवळ २३ टक्के वाचकांनी ‘देवेंद्र फडणवीस बहुमताची परीक्षा पास होतील असं वाटतं’ असं मत व्यक्त केलं आहे. फडणवीस सरकार पडेल असं मत १९ हजार वाचकांनी व्यक्त केलं तर फडणवीस सरकार बहुमत सिद्ध करु शकेल असं मत ६ हजार जणांनी व्यक्त केलं.

ट्विटरवरही या पोलमध्ये दोन हजारमधून अधिक जणांनी सहभाग नोंदवला. तेथील ७१ टक्के वाचकांनी सरकार पडेल असं मत व्यक्त केलं तर केवळ २९ टक्के वाचकांनी सरकार टीकेल असं मत व्यक्त केलं.

या जनमतावरुन वाचकांनी भाजपाने अजित पवारांच्या मदतीने स्थापन केलेले सरकार टीकणार नाही असंच मत व्यक्त केल्याचे दिसत आहे. आज सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निकालामध्ये, “लोकशाही मूल्यांचं रक्षण होणं आवश्यक आहे. लोकांना चांगलं सरकार मिळणं हा मुलभूत अधिकार आहे. तसेच घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतेही गुप्त मतदान न घेता उद्या (२७ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश आम्ही देत आहोत,” असं न्यायाधिशांनी स्पष्ट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 3:03 pm

Web Title: loksatta poll davandra fadanvis will fail to clear floor test in maharashtra scsg 91
Next Stories
1 बहुमताचा आकडा जमवता आला नसल्याची मोदी सरकारमधील मंत्र्याची कबुली
2 “शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांना आपल्या मर्यादेत राहा असं सांगितलं का?”
3 अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
Just Now!
X