सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्यात येत असून, आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राजीनामा देण्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सत्तेसाठी शिवेसना लाचार झाल्याची टीका केली. यावरुनच ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने जनतम जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या जनमत चाचणीमध्ये वाचकांनी फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेली टीका चुकीची असल्याचे मत व्यक्त केले आहे. शिवसेना लाचार झाली नाही असं मत ७१ टक्क्यांहून अधिक वाचकांनी व्यक्त केले आहे.

“भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचं एवढा एकच अजेंडा शिवसेनेने राबवला. एरवी मातोश्रीबाहेर न पडणाऱ्यांनी इतरांच्या पायऱ्या झिजवल्या, लाचारी पत्करली हे महाराष्ट्राने पाहिलं,” अशा शब्दात फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. “शिवसेनेने लढलेल्या जागांपैकी त्यांना अवघ्या ५४ जागांवर यश मिळालं. त्यांचं यश साधारण ४५ टक्के होतं. तर भाजपाने ७० टक्के यश मिळवलं. मात्र संख्याबळ लक्षात घेऊन शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हा दावा केला. मात्र असं काहीही ठरलं नव्हतं,” असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले. यावरुनच जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता वाचकांनी फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेली टीका चुकीची असल्याचे म्हटले आहे.

फेसबुकवर आणि ट्विटवर ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने ‘सत्तेसाठी शिवसेना लाचार झाली हा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप पटतो का?,’ असा प्रश्न वाचाकांना विचारला होता. १८ तासांमध्ये या प्रश्नावर १८ हजार ५०० हून अधिक जणांनी मत नोंदवले आहे. त्यापैकी ७१ टक्के म्हणजेच १३ हजारहून अधिक जणांनी नाही असे उत्तर दिले आहे. तर केवळ पाच हजार ३०० जणांनी फडणवीस यांची बाजू घेत त्यांनी केलेला आरोप योग्य असून शिवसेनेने लाचारी पत्कारल्याचे मत नोंदवले आहे.

एकीकडे फेसबुकवरील कल हे एका बाजूने असल्याचे दिसत असले तरी ट्विटवर मात्र ही जनमत चाचणी संपण्यास काही तास शिल्लक असतानाच होय आणि नाही असे उत्तर देणाऱ्यांची संख्या जवळजवळ समान असल्याचे दिसत आहे. ट्विटवर पाच हजारहून अधिक जणांनी आपलं मत नोंदवलं आहे. ५२ टक्के वाचकांनी शिवसेना सत्तेसाठी लाचार झाल्याचे म्हटले आहेत तर ४८ वाचकांनी शिवसेना लाचर झाली नसल्याचे म्हटलं आहे.

ही जनमत चाचणी संपण्यासाठी काही तास शिल्लक असल्याने ट्विटवर सुरु असणारी चूरस आणखीन रंगतदार होण्याची चिन्हं दिसत आहेत.